डोंबिवली परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी महाविद्यालय व्यवस्थापनावर दबाव टाकतात. अनेक विद्यार्थ्यांना राजकीय दबावापोटी महाविद्यालयात प्रवेश मिळतो. राजकीय ‘आशीर्वादा’तून प्रवेश मिळवणारे असे अनेक विद्यार्थी महाविद्यालयात गुंडगिरीची बीजे रोवतात, असा धक्कादायक निष्कर्ष डोंबिवलीत शिक्षकांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला. अशा वशीलेबाज विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालय परिसरात हाणामाऱ्या, विनयभंगसारखे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत, असेही या शिक्षकांचे म्हणणे होते. राजकीय दबाव टाकून प्रवेश मिळवण्याचे मोठे पेव डोंबिवलीत फुटले आहे. त्यामुळे राजकीय संसर्गातून विद्यार्थीही गुंडगिरी करू लागले आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी सामाजिक संघटनांच्या एका बैठकीत दिली.
डोंबिवलीतील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार, डोंबिवली परिसरातील वाढते विनयभंग, बलात्कारासारख्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीकर नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, याविषयी विचार करण्यासाठी शहरातील काही सामाजिक संस्थांनी महाविद्यालयातील शिक्षकांसोबत एक संयुक्त बैठक सुयोग मंगल कार्यालयात आयोजित केली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्रिय नागरिक मंच यांच्या पुढाकाराने प्रा.उदय कर्वे, मेजर विनय देगांवकर यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. विविध क्षेत्रांतील सुमारे शेकडो रहिवासी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. डोंबिवली परिसरातील अनेक राजकीय नेते महाविद्यालय ही आपली जहागिरी आहे अशा थाटात महाविद्यालयात येतात. ३५ ते ४० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांला महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी भाग पाडतात. महाविद्यालयात आल्यानंतर प्रवेशासाठी अनेक पालक आणि विद्यार्थी रांगा लावून असतात. राजकीय नेते प्राचार्याच्या केबिनचा दरवाजा ढकलून आत शिरतात. चढय़ा आवाजात त्यांचा वशिला असलेल्या विद्यार्थ्यांला प्रवेश देण्यास भाग पाडतात. अशा प्रकारे प्रवेश मिळणारा विद्यार्थी खरंच गरजू असतो का, असा सवाल या बैठकीत अनेक शिक्षक प्रतिनिधींनी उपस्थित केला. ज्या थाटात आपल्याला प्रवेश मिळाला आहे ते पाहून यापैकी काही विद्यार्थी गुंडगिरीच्या मार्गाने जाऊ लागले आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. हे विद्यार्थी वर्गात उपस्थित नसतात. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने काढून टाकले तर पुन्हा राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अशा विद्यार्थ्यांची बाजू घेऊन महाविद्यालयात कांगावा करीत येतात. ‘त्या’ विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका म्हणून बजावतात, असे या शिक्षकांनी सांगितले. बैठकीत घडलेल्या चर्चेचे एक निवेदन साहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यवंशी यांना यावेळी देण्यात आले.
राजकीय नेत्यांच्या ‘संसर्गा’तून विद्यार्थ्यांमध्ये गुंडगिरी
डोंबिवली परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी महाविद्यालय व्यवस्थापनावर दबाव टाकतात. अनेक विद्यार्थ्यांना राजकीय दबावापोटी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
First published on: 28-06-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College management in dombivli under pressure for admission from different political party