ज्या महाविद्यालयांनी प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षक या पदांची पूर्तता केली असेल तसेच पायाभूत सुविधा असतील त्याच महाविद्यालयांच्या २०१४-१५ वर्षांसाठी संलग्नीकरण, नूतनीकरण आणि नैसर्गिक विस्ताराच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा सर्वानुमते निर्णय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संलग्नीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, ललित कला, व्यवस्थापन शास्त्र, शिक्षण शास्त्र आदी महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचे काही प्रस्ताव बैठकीसमोर आले असता त्यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली.
महाविद्यालयांना स्थानिक चौकशी समित्या भेट देतात. मात्र अहवालात त्या महाविद्यालयांच्या त्रुटी दर्शविण्यात येऊनही काही अटीवर मान्यता दिली जावी अशा शिफारशी केल्या जातात. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक चौकशी समित्यांच्या अहवालाची छाननी करून विशेष समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींचा पुन्हा नव्याने विचारविनीमय करून ज्या महाविद्यालायंमध्ये प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक आदी पदे भरली गेलेली असतील त्याच महाविद्यालयांना मान्यता दिली जावी अन्यथा या महाविद्यालयांचे २०१४-१५ पासून प्रथम वर्षांचे प्रवेश थांबवावेत असा सर्वानुमते निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीत पर्यावरण अभ्यासक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये शिक्षक नियुक्त करण्याबाबत विद्यापीट अनुदान आयोगाने जे पत्र पाठविले आहे. त्या अनुषंगाने चर्चा होऊन शिक्षकांच्या पद भरतीसाठी महाविद्यालयांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावेत. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पदे भरावीत असेही बैठकीत ठरले.
पाळदी येथील पंडित अण्णा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच या महाविद्यालयात कोणतेही शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा घेता आली नाही असा अहवाल बहिस्थ परीक्षार्थीनी दिला होता.
यावर बैठकीत चर्चा होऊन विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९१ (४) प्रमाणे या महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी समिती नियुक्त करण्यात आली.
विद्यापरिषदेच्या या बैठकीस प्रा. डी. जी. हुंडीवाले, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा