पिठूर चांदरात की
अजून संभ्रमात मी
मनातल्या उन्हातला
विषण्ण पारिजात मी
कवयित्री जयश्री वाघ यांनी सादर केलेल्या या गझलमधून स्त्रीच्या मनातील गुंतागुंत, अनामिकता व्यक्त झाली आणि उपस्थितांना ते भावले. निमित्त होते येथील ‘संवाद’ या संस्थेच्या वतीने गंगापूर रस्त्यावरील देशपांडे उद्यान वाचनालयात आयोजित कवयित्रींच्या काव्यवाचनाचे.
वाघ यांच्यासह जयश्री पाठक, अलका कुलकर्णी, निशिगंधा घाणेकर यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
पाऊस, प्रेम, निसर्ग, विद्रोह, रंग, सामाजिक अशा विविध विषयांच्या कविता, गझल, गीत, मुक्तछंद या प्रकारात शब्दांची गुंफण करून चारचौघींचे अनोखे काव्यसंमेलन रंगले. निशिगंधा घाणे यांनी-
निळा सावळा
तुझ्या प्रीतीचा छंद मला दे
तुझा रंग मला दे
तुझा गंध मला दे
या रंगाच्या कवितेतून प्रेमाचे अनोखे रंग प्रतीत झाले. अलका कुलकर्णी यांनी-
मी फूल पैंजणी बांधलं
प्रतिबिंब जळी नव चांदणे
नव चंद्र नव नवी पौर्णिमा
नव छंद शिल्प ही कोरणे
या गीतातून प्रेमाची नाजूक भावना, आर्तता मांडली. जयश्री पाठक यांनी-
जा जा जा रे घना
नगरात साजनाच्या
सांगून ये जरासा
या वेदना मनाच्या
या गीतातून प्रेमाचा हळुवारपणा, विरह याचे वेगळे दर्शन घडवले. संवादचे अध्यक्ष किशोर पाठक यांनी कवयित्रींचा सत्कार केला. सचिव राम पाठक यांनी प्रास्ताविक केले.