‘एक लढवय्या नेता हरपला’, ‘तरुणांच्या मनात स्फुल्लिंग चेतवणाऱ्या नेत्यास महाराष्ट्र मुकला’ अशा शब्दांत जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ठाकरे यांच्या नगर शहरात चार प्रचारसभा झाल्या, त्याचीही आठवण अनेकांच्या स्मरणात आजही आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने लढवय्या पुरूषाला महाराष्ट्र मुकला आहे. देशातील युवकांची नाडी त्यांनी ओळखली होती. त्यामुळे आजही तरूण त्यांच्याकडे आकर्षित होत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राबरोबरच देशातील, विशेषत: मराठी माणसांची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून येणार नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी बाळासाहेब प्रेरणास्थान होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
पालकमंत्री बबनराव पाचपुते- ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्रात गेली ४०-५० वर्षे सुरू असलेला झंजावात शमला आहे. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी तरूणांच्या मनात स्फुल्लींग पेटवले होते. ते एक ज्वाज्वल्य विचारांनी समाजकारण व राजकारणास जोडणारे व्यक्तिमत्व होते. मराठी माणसावर अलोट प्रेम करणारे नेतृत्व हरपल्याने पोकळी निर्माण झाली आहे.
महापौर शीला शिंदे- ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे वैभवच हरवले आहे. ते एक लढवय्या नेता होते. एकच संघटना ४० वर्षे एकहाती चालवणारा त्यांच्यासारखा लोकप्रिय नेता पूर्वी झाला नाही, यापुढेही होणे नाही.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- एक झंजावती व्यक्तिमत्व म्हणून राज्याच्या राजकारणात व समाजकारणात ठाकरे यांचे स्थान मोठे होते.राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिशा देऊन कायम मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले असून एक लढवय्ये नेतृत्व हरपले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे- ठाकरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आधार व मराठी माणसाचा श्वास गेला. त्यांच्या निधनाने राज्याची व देशाची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून मनाने प्रेमळ, स्वभावाने जिद्दी असलेल्या बाळासाहेबांनी आपले सर्व आयुष्य मराठी माणसासाठी वेचले. निर्भयपणे जगताना त्यांनी लोकांनाही निर्भय बनवले. बालपणापासूनच ते लढवय्ये होते. आमचे मित्रत्वाचे संबंध होते व त्यात कधी पक्षीय बंधने आडवी आली नाहीत. आमच्या अनेक वेळा एकत्र सभा झाल्या. देशाचे, राज्याचे हित पाहूनच त्यांनी राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत पाठिंबा दिला. व्यापक दृष्टी असणाऱ्या व राष्ट्रहित पाहणाऱ्या या नेत्याच्या निधनाने आपली व्यक्तीगत, तसेच राज्याची मोठी हानी झाली आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे – महाराष्ट्राची अस्मिता जपणारे ठाकरे काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्याचे व देशाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. काँग्रेस पक्ष व राज्य सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे- बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकार होते, त्यांच्या मार्मिक शैलीने ते तत्कालीन प्रश्नांना वाचा फोडून सरकारला वारंवार धारेवर धरत असत. त्यांच्याकडे मोठी इच्छाशक्ती होती. त्यांच्या निधनाने उत्तम संघटन कौशल्य असलेला, स्पष्ट विचारांचा नेता हरपला. ठाकरी बाजामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती.
बबनराव ढाकणे (माजी केंदीय मंत्री)- जनतेने ठाकरे यांच्यावर जे प्रेम केले ते इतर कोणत्याही नेत्याच्या वाटय़ाला आले नाही. संघर्ष कसा करावा याची शिकवण त्यांनी तरूणांना दिली. त्यांच्या जाण्याने राज्य व देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे- महाराष्ट्रातील मराठी मनाचा, महाराष्ट्राला जागवणारा व उभ्या महाराष्ट्राचा आधारवड आज कोसळला. जगातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्यापासून समाजाला कायम स्फूर्ती व चेतना मिळत राहिली. सन २००९ मध्ये मी खासदार झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता मातोश्रीवर गेलो. तेव्हा त्यांनी मला कुरवाळले व हा हिरा इतके दिवस कुठे दडला होता, असे विचारले. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. ज्वलंत िहदुत्वाचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असून शिवसैनिकच नव्हे तर महाराष्ट्र व देश पोरका झाला आहे.
खासदार दिलीप गांधी- ठाकरे यांनी एका समर्पित भावनेने शिवसेना उभी केली, स्वाभीमानी तरुणांचे नेतृत्व उभे करुन त्यांना आत्मसन्मान शिकवला. सर्व विषयांचा अभ्यास करून ते आपली मते स्पष्टपणे व निर्भिडपणे मांडत, त्यामुळे जनतेला ते आपल्या मनातीलच बोलत आहेत, अशी भावना होत असे. महाराष्ट्रातील युतीच्या कालखंडात त्यांनी आपले विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला.
गोिवदराव आदिक (सरचिटणीस, राष्ट्रवादी)- ठाकरे यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान व अस्मिता शिकविली. त्यांनी या विषयावर आगळे-वेगळे व जिवंत वातावरण तयार करून आपल्या विचारांतून तरूण पिढीला नवचैतन्य दिले. राज्याच्या अस्मितेच्या प्रश्नावर त्यांच्याशी कुणाचेही दुमत नव्हते. लोकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. आदिक कुटुंबियांचे त्यांच्याशी वैयक्तीक संबंध होते. शिवसेनेची स्थापना मुंबईत ज्या सभेत झाली त्या सभेचे अध्यक्ष थोरले बंधू कै. रामराव आदिक होते. दोघांची घनिष्ट मैत्री होती. त्यांनी एकत्र काम केले. माझीही अनेकदा त्यांच्याशी चर्चा होत होती.
आमदार अशोक काळे- त्यांच्या नसण्याची उणीव पदोपदी भासणार आहे. ते स्पष्ट विचारांचे होते, त्यामुळे सर्वधर्मीयांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाटत होते. असा तत्त्ववादी समाजसेवक आता होणे नाही.
आमदार राम शिंदे- गेली चार दशके हिंदू मनावर राज्य करणाऱ्या व मराठी अस्मितेचा स्वाभीमान देशभर जागवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे.
आमदार भाऊसाहेब कांबळे- मुंबईच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आज हरपला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण, समाजकारण करताना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची नेहमीच भूमिका असे. आज महाराष्ट्रातील गोरगरिब मदतीचा हात देणाऱ्या नेत्यास मुकले आहेत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
शशिकांत गाडे (दक्षिण जिल्हाप्रमुख, शिवसेना)- स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीतील ठाकरे सच्चा देशप्रेमी नेता होते. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याबद्दल जी तळमळ होती, तीच तळमळ ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल होती. देशहितही त्यांनी अत्यंत परखडपणे जपले. ते केवळ हिंदूंचे नेते नव्हते, तर अवघ्या देशाचे नेते होते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण केला. सत्तेवर नसतानाही सत्ता झुकवणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
रावसाहेब खेवरे (उत्तर जिल्हाप्रमुख, शिवसेना)– छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सेनाप्रमुखांनी देश वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वत:साठी काही मिळविले नाही. खुर्चीवर त्यांचे प्रेम नव्हते. त्यांनी इतरांना खुच्र्या मिळवून दिल्या. त्यांच्या निधनाने शिवसैनिकच नाही तर देशाचे नुकसान झाले.
जयंत ससाणे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)- केवळ शिवसेनेचाच नाही तर उभ्या महाराष्ट्राचा ‘सुप्रिमो’ गेल्याचे शल्य आज वाटत आहे. मुंबईसह महाराष्ट्रभर मराठी माणसाची होणारी गळचेपी त्यांनी मोडून काढली, त्यामुळे ते सर्वाचा आधार होते. ४०-५० वर्षांत केवळ चांगल्या कामांना पाठबळ देऊन त्यांनी गरिबांचा उद्धार केला. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही.
ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे- ठाकरेंच्या निधनामुळे दाणेदार, धारदार व करारी व्यक्तिमत्व हरपले. त्यांना मी श्रद्धांजली अर्पितो.
अंबादास पंधाडे (माजी जिल्हाप्रमुख व नगरसेवक)- अत्यंत त्यागी व नि:स्वार्थी असे ठाकरे यांचे नेतृत्व होते. महाराष्ट्रात त्यांना स्वत:ला किंवा मुलगा उद्धव यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असताना त्यांनी ती इतरांना दिली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीचालक, टपरीचालक, स्टॉलवाले असे सामान्य कार्यकर्ते आमदार, खासदार, नगरसेवक झाले, कार्यकर्त्यांना त्यांनी मुलासारखे सांभाळले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत नगरला आले असताना वकील सतीश उदास यांच्या घरी ते राहिले होते, त्यावेळी झालेल्या भेटीचा प्रसंग माझ्या अजून डोळ्यासमोर आहे.
संभाजी कदम (शहरप्रमुख, शिवसेना)- गेली ५० वर्षे त्यांनी हिंदुत्वाचा एक झेंडा, एक रंग, एक विचार तरुणांच्या मनामनात रुजवला. त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक भेटीत एक प्रकारची स्फूर्ती मिळे. नगरच्या महापौरपदी शिला शिंदे यांची निवड झाल्यावर आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो, त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून, ‘तुमच्या कामाचा आनंद वाटतो’, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्याची आठवण झाली की मन भरुन येते.
माजी महापौर भगवान फुलसौंदर- केवळ आमचा कुटुंबप्रमुखच नाही तर महाराष्ट्राचा श्वासच निघून गेला आहे. साहेब आमचे दैवत होते. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्यास महापौरपद व हजारो शिवसैनिकांना प्रतिष्ठा मिळाली.
माजी उपमहापौर दीपक सूळ- जात-पात, पैसा यापलिकडे जाऊन सर्वसामान्यांना सत्तेचे दरवाजे उघडे करणारे निर्भिड नेतृत्व व हिंदूत्वाचा तेजसूर्यच हरपला आहे.
संदेश कार्ले (नगर तालुकाप्रमुख, शिवसेना) – प्रचंड इच्छाशक्ती व दूरदृष्टी असलेले ठाकरे यांचे नेतृत्व होते. त्यांनी ५० वर्षांंपूर्वी काढलेले व्यंगचित्रे आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू पडतात. राजकीय फायद्या-तोटय़ाचा विचार न करता ते देशप्रेम व सर्वसामान्यांना प्राधान्य देत.
रघुवीर खेडकर (तमाशा फड चालक संघटनेचे राज्य अध्यक्ष व कलावंत)- एक कलाकार म्हणून त्यांच्याशी माझे अत्यंत स्नेहाचे नाते होते. महाराष्ट्रातील ते सर्वात मोठे नेतृत्व होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून राज्यातील तमाशा कलावंत दोन दिवस कार्यक्रम करणार नाहीत.
‘लढवय्या नेता हरपला..’
‘एक लढवय्या नेता हरपला’, ‘तरुणांच्या मनात स्फुल्लिंग चेतवणाऱ्या नेत्यास महाराष्ट्र मुकला’ अशा शब्दांत जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 02:36 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Combatant leader lost