दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयात सुनावली गेल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी तिघा मारेक-यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयललिता यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच दुसरीकडे स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनीही भाजपच्या नेत्यांविषयी धमकीवजा वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांचाही पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दहन केला.
सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक कार्यकर्त्यांनी जयललिता यांच्या विरोधात संतप्त घोषणा दिल्या. जयललिता यांचे कृत्य देशद्रोही असून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली. राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे जयललिता यांना कसलेच गांभीर्य नाही, अशी टीका त्यांनी केली. नंतर घोषणाबाजी करीत जयललिता यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दरम्यान, स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना भाजपच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरून धमकावणीची भाषा केल्याच्या निषेधार्थ टिळक चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. नगरसेवक नागेश वल्याळ, अविनाश पाटील व नरेंद्र पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. नंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सदर पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरूध्द फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

Story img Loader