* पाणी बचतीसाठी विद्यार्थी सरसावले
* सोसायटय़ांच्या आवारात रंगणार पथनाटय़े
निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असून ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचे भान राखून पाण्याचा वापर टाळून, केवळ रंग उधळून यंदाची होळी कोरडी साजरा करावी, असे आवाहन करणारी पथनाटय़े तरुण मंडळी शनिवारपासून ठिकठिकाणच्या सोसायटय़ांमध्ये सदर करीत ‘पाणी बचती’चा मंत्र मुंबईकरांना देणार आहेत.यंदा मराठवाडा, विदर्भातील अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघाली आहेत. महाराष्ट्राच्या एका भागात पिण्याच्या पाण्याची वानवा असताना मुंबईकरांनी जलतरण तलावांमध्ये डुंबून किंवा अन्य माध्यमातून पाण्याचा अपव्यय करीत होळी साजरी करणे हे असंवेदनशीलतेचेच लक्षण म्हणायला हवे. नवी मुंबईत आसाराम बापूंनी आपल्या भक्तांवर रंगीत पाण्याचा जोरदार फवारा मारत निर्लज्जपणाचा कळस केला होता. राज्यावर कोसळलेल्या दुष्काळाच्या आपत्तीची जाणीव हजारो भक्तगणांच्या आध्यात्मिक गुरूला नसली तरी सामान्य मुंबईकरांना निश्चितपणे आहे. विद्यार्थ्यांच्या पथनाटय़ातून ही जाणीव जागृत करण्याचे काम विद्यार्थी शनिवारपासून करणार आहेत.
‘मुंबई विद्यापीठाने स्टुडंट्स कौन्सिलच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला असून त्यात महाविद्यालयांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे,’ अशी माहिती विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी कल्याण विभागा’चे संचालक मृदुल निळे यांनी दिली. ‘रंग उधळा, दुष्काळ पळवा’, ‘नो वॉटर, ओन्ली कलर’ आदी घोषवाक्यांचे फलक घेऊन हे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाच्या आणि सोसायटीच्या आसपासच्या परिसरात फिरुन पथनाटय़े आणि स्कीट सादर करताना दिसतील.
‘या उपक्रमातून आपण दुष्काळावर मात करू अशी अपेक्षा नाही. पण, दुष्काळात भाजून निघणाऱ्या आपल्या समाजाच्या एका घटकाच्या वेदना समजून घेण्याचा आणि त्यांना सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न तरी आपण निश्चितच करू शकतो,’ अशी प्रतिक्रिया या उपक्रमात सहभागी असलेल्या ‘रुपारेल महाविद्यालया’च्या मनाली भांडारकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
या उपक्रमातील सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून विशेष प्रमाणपत्र तर मिळणार आहेच. शिवाय विद्यार्थ्यांना प्रवास व खाण्यापिण्याचा खर्चही महाविद्यालयांच्या वतीने करण्यात येणार आहे. महाविद्यालय, विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सिल्सचे सदस्य, एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी या पथनाटय़ात सहभागी होतील. या विद्यार्थ्यांच्या मदतीला एक शिक्षकही असेल. ‘पाणी वाचवा’, ‘कोरडी होळी साजरी करा’, असा संदेश देत हे विद्यार्थी होळीपर्यंत आपल्या आजुबाजूच्या परिसरात जनजागृती करणार आहेत.
चला खेळूया कोरडी होळी..
निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असून ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचे भान राखून पाण्याचा वापर टाळून, केवळ रंग उधळून यंदाची होळी कोरडी साजरा करावी, असे आवाहन करणारी पथनाटय़े तरुण मंडळी शनिवारपासून ठिकठिकाणच्या सोसायटय़ांमध्ये सदर करीत ‘पाणी बचती’चा मंत्र मुंबईकरांना देणार आहेत.
First published on: 23-03-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Come we will play dry holi