हिंदी सिनेमात सध्या रिमेक आणि सीक्वेलपटांची चलती आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील चित्रपटांमधील कथानके थोडी नवीन फोडणी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने मांडण्याचा सिलसिला सुरू झालाय. त्यात ‘झोम्बी-विनोदी’ या प्रकारातला चित्रपट थेट हॉलीवूडपटाची गोष्ट वापरून का होईना पण हिंदीच्या रूपेरी पडद्यावर आणणे हा नवा प्रकार आहे. ‘गो गोवा गॉन’ हा विनोदी चित्रपट पहिला ‘बॉलीवूड झोम्बी’ चित्रपट ठरलाय. चित्रपटातला विनोद हलकाफुलका असला तरी प्रेक्षकाची करमणूक करण्यात दिग्दर्शकद्वयी अर्धी यशस्वी ठरली आहे.
हॉलीवूडपटांमध्ये ‘व्हॅम्पायरपट’ आणि ‘झोम्बी’पट भरपूर येऊन गेले आहेत. त्यातले काही गाजलेही आहेत. झोम्बी विनोदीपट आणि झोम्बी भयपट असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे यात आढळतात. परंतु, आपल्याकडे भयपट किंवा थरारपटांचा फॉम्र्युला ठरून गेलाय. त्यामुळेच की काय मनोरंजन करणारा हिंदी प्रेक्षकाला रुचेल असा विनोदी झोम्बीपट करण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकद्वयींनी केला आहे. झोम्बी म्हणजे स्वजातिभक्षक मानव किंवा रक्ताची चटक लागलेली मृत परंतु जिवंत असलेली माणसे असे म्हणता येईल. हार्दिक (कुणाल खेमू), लव (वीर दास) आणि बन्नी (आनंद तिवारी) असे तीन जिवलग मित्र बन्नीच्या भाडय़ाच्या घरात राहतात. बन्नी हा सीधा-साधा तरुण. तो हार्दिक आणि लव दोघांनाही आपल्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून देतो. परंतु, सदान्कदा मुली-बाटली-सिगारेट यांच्यासाठी झुरत नेहमी पार्टीच्या मूडमध्ये वावरणाऱ्या हार्दिकची नोकरी अखेर जाते. लव हाही हार्दिकच्याच गटात मोडणारा तरुण आहे. मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिनी दगा दिला म्हणून तिला सोडून देतो. कायम टाईमपास करणे, मौजमजा करणे याकडे हार्दिक व लवचा कल आहे. तर बन्नी हा सीधासाधा, प्रामाणिकपणे नोकरी करून पैसे कमावणारा, सतत चांगल्या गोष्टींचा विचार करणारा, निव्र्यसनी, न-उडाणटप्पू अशा प्रकारचा आहे. बन्नीने मिळवून दिलेली नोकरी लव आणि हार्दिक दोघेही गमावून बसतात. खिशात पैसे नसले तरी मौजमजा करण्याची संधी कधीही न सोडणारे हे दोघे कामानिमित्त गोव्याला जाणाऱ्या बन्नीसोबत येतात. आणि बन्नीला जबरदस्तीने एका निर्जन बेटावर रेव्ह पार्टी करायला जातात. लुना (पूजा गुप्ता) हिच्या आमंत्रणावरून लव सगळ्यांना रेव्ह पार्टीला घेऊन जातो. तिथे एका रात्रीत ज्या काही घटना घडतात त्यामुळे तिन्ही जिवलग मित्रांचे आयुष्य बदलून जाते.
मध्यांतरापर्यंत दिग्दर्शकद्वयींनी विनोदी करमणूक उत्तम सादर केली आहे. निरुद्योगी हार्दिक आणि लव हे दोघे टीव्ही पाहात बसले असताना टीव्हीवरचा कार्यक्रम रिमोटने बदलायचा असतो. समोरच पडलेला रिमोट हातात घेऊन चॅनल बदलायचाही या दोघांना इतका कंटाळा येतो असे दाखविले आहे. या छोटय़ाशा गोष्टीतून दोघांचा निव्वळ मौजमजा करण्याकडे असलेला कल आणि निरुद्योगी निरुत्साह हा स्वभावपैलू दिग्दर्शकाने दाखवून दिला आहे. मध्यांतरापर्यंत चांगली करमणूक करणाऱ्या या चित्रपटात मध्यांतरानंतर झोम्बींचा प्रवेश होतो आणि रशियन माफिया बोरिस (सैफ अली खान) याचा प्रवेश होतो आणि झोम्बींना बंदुकीच्या गोळ्यांनी ठार करणे किंवा त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून घेणे एवढेच चित्रपटात उरते. त्यामुळे चित्रपट थोडा कंटाळवाणा ठरतो. तरुणाईची मानसिकता, झोम्बीचे सौम्य दर्शन यामुळे चित्रपट किळसवाणा ठरत नाही. हॉलीवूडचे झोम्बीपट पाहणाऱ्यांना यात काही नावीन्य जाणवणार नाही.
सैफ अली खानने साकारलेला बोरिस यासह कुणाल खेमू, वीर दास, आनंद तिवारी आणि पूजा गुप्ता यांनी अभिनय भूमिकांना साजेसा केल्यामुळे ते चित्रपटाचे बलस्थान ठरले. अर्थात बॉलीवूडचा झोम्बी विनोदी प्रकारातला हा चित्रपट असल्यामुळे तर्कसुसंगत असण्याची अपेक्षा करूच नये हेही खरेच.
गो गोवा गॉन
निर्माते – सैफ अली खान, दिनेश विजन, सुनील लुल्ला
दिग्दर्शक – राज निदीमोरू, कृष्णा डी के
संगीत – सचिन-जिगर
कलावंत – कुणाल खेमू, आनंद तिवारी, सैफ अली खान, वीर दास, पूजा गुप्ता
झोंम्बींशी विनोदी झुंज..
हिंदी सिनेमात सध्या रिमेक आणि सीक्वेलपटांची चलती आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील चित्रपटांमधील कथानके थोडी नवीन फोडणी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने मांडण्याचा सिलसिला सुरू झालाय.
First published on: 12-05-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy fight with zombi