औषधांच्या वापराबाबत सर्वसामान्य रु ग्णांना नेमकी आणि २४ तास माहिती देणारी राज्यपातळीवरील ‘टोल फ्री फोन सेवा’ राज्य औषध व्यवसाय परिषदेने सुरू करावी, अशी गृह व अन्न औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलेली सूचना परिषदेने तत्काळ मान्य करून येत्या १५ दिवसांत ही सेवा सुरू करण्याची ग्वाहीही शनिवारी दिली. या वेळी मंत्री पाटील यांनी डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवरील अक्षरे न समजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चुकीची औषध दिली जाऊ नयेत म्हणून औषधांच्या यादीचे स्वरूप कसे असावे, यासाठी नियमावली करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या वतीने सांगलीत तीन दिवसांच्या ‘आधुनिक रु ग्ण समुपदेशन’ या राज्यातल्या पहिल्याच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी श्री. पाटील यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय आणि राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उपस्थितांचे स्वागत जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शहा यांनी केले.
राज्याचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, की आधुनिक जगाच्या स्पर्धेत आमचा औषध विक्रेता डॉक्टरांची चिठ्ठी बघून औषधे देऊन पैसे घेण्यापुरताच मर्यादित राहू नये. रु ग्णांना औषधांची माहिती, त्याचे परिणाम, दुष्परिणाम त्याला सांगता आले पाहिजेत. तो डॉक्टरांचा सहायक आणि रुग्णांचा विश्वासू आधार बनला पाहिजे. हाच आमचा हेतू आहे. या वेळी परिषदेच्या माहिती केंद्राच्या निबंधक सायली मसाल यांनी कार्यशाळेतील अभ्यासक्रमाचा आढावा घेतला.
जगन्नाथराव िशदे म्हणाले, बोगस डॉक्टर व बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणारी मंडळी सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. अशा पाश्र्वभूमीवर आरोग्य साक्षरतेबरोबरच ग्राहकाला मूल्यवर्धित सेवा देऊन आकर्षित करण्याशिवाय औषध विक्रेत्याला पर्यायच नाही. या दुहेरी भूमिकेला न्याय देणारा तुल्यबळ औषध विक्रेता आम्हाला तयार करायचा आहे. या उपक्रमासाठी सरकारने मुंबईत आम्हाला जागा द्यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली. ते म्हणाले, की चुकला म्हणून शिक्षा देऊन नाहीतर शिक्षण दिल्याने समाज सुधारणार आहे. अशा विचारधारेवर आमची संघटना काम करत असल्याने आम्हाला सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, की ‘नो फार्मासिस्ट, नो औषध दुकान’ हे सरकारचे धोरण आहे. कारवाई सुरू झाल्यापासून तीन हजार औषध दुकानदारांनी आपले परवाने सरकारला परत केले आहेत. यापुढे कारवाईचे वेळ येऊ देऊ नका. चुकीच्या औषधांमुळे विपरीत परिणाम भोगावा लागणाऱ्यांची संख्या ७ टक्के आहे. याला डॉक्टरच जबाबदार आहेत. कारण बऱ्याच वेळा डॉक्टरांचे अक्षरच कळत नाही. एखादे अक्षर बदलले तरी संपूर्ण औषधच बदलते. त्यामुळे चुकीची औषध दिली जातात. यापुढे अशा चुका टाळण्यासाठी औषधांच्या चिठ्ठी देण्याची एक नियमावलीच अमलात आणण्याचा विचार आहे. हृदयविकारावर उपचार घेतल्यानंतरचे बिल बघितले, की तिथेच दुसरा अटॅक येतोय. रु ग्ण नसलेले घर सापडणे कठीण आहे, अशा पाश्र्वभूमीवर औषध विक्रेता ज्ञानी होतोय, त्याच्याकडून योग्य औषधमात्रा आणि आरोग्याची काळजी घेण्याविषयीची माहिती रु ग्णांना वेळीच मिळत गेली, तर अतिशय चांगले होईल. सरकार या उपक्रमाला आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्याच कार्यशाळेत ३६ जणांना परिषदेच्या माहिती केंद्राच्या सायली मसाल, कु. किन्नरी देसाई यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. काल उद्घाटनाच्या कार्यक्रमास पश्चिम विभागाचे अध्यक्ष मदन पाटील, मुंबईचे प्रसाद दानवे, गुलाबराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महेशभाई पारेख, सत्यजित पाटील, परिषदेच्या सहायक निबंधक सविता नेते, विवेक चौधरी, सत्यजित पाटील यांच्यासह सांगली, सातारा, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, विक्रेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
औषधांच्या माहितीसाठी ‘टोल फ्री फोन सेवा’ लवकर
औषधांच्या वापराबाबत सर्वसामान्य रु ग्णांना नेमकी आणि २४ तास माहिती देणारी राज्यपातळीवरील ‘टोल फ्री फोन सेवा’ राज्य औषध व्यवसाय परिषदेने सुरू केली जाणार आहे.
First published on: 28-05-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coming soon toll free phone service for information of medicine