पोलीस व महापालिका प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे सोलापूर शहरात डिजिटल फलकांचे पेव फुटले असून आता दसरा आणि धम्मचक्र परिवर्तनदिनाच्या पाश्र्वभूमीवर डिजिटल फलकांची गर्दी झाल्याने शहराचे अक्षरश विद्रुपीकरण झाले आहे. परंतु महापालिकेचे नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपला मोर्चा या डिजिटल फलकांकडे वळविला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून विनापरवाना उभारले गेलेले डिजिटल फलक संबंधितांनी स्वतहून काढून न टाकल्यास प्रशासनाच्या वतीने फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा गुडेवार यांनी दिला आहे.
शहरात विविध नऊ ठिकाणी ‘नो डिजिटल झोन’ असताना त्याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मोठय़ा प्रमाणात डिजिटल लावले जातात. राष्ट्रपुरुषांची जयंती-पुण्यतिथी, धार्मिक व सांस्कृतिक उत्सव, गावगन्ना पुढा-यांचे वाढदिवस आदी निमित्त पुढे करून डिजिटल फलकांची गर्दी केली जाते. यात अनेकवेळा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, समाजकंटकांच्या छबी दिसतात. डिजिटल फलकावरून काही वेळा कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पोलीस व महापालिका प्रशासनाने डिजिटल फलकांच्या वाढत्या गर्दीकडे काणाडोळा केल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त अजय सावरीकर यांच्या कार्यकाळात डिजिटल फलकांचा प्रश्न उपस्थित झाला असता संबंधित ‘छबी’ दार गावगन्ना पुढा-यांनी आयुक्तांच्या दालनातच घुसून गोंधळ घातला होता. त्यावेळी आयुक्तांनी कायद्याचा धाक दाखविण्याऐवजी धटिंगनशाहीपुढे  ‘लोटांगण’ घातले होते. त्यामुळे हा चच्रेचा विषय होऊन डिजिटल फलकांची गर्दी वरचेवर वाढत चालली असताना अखेर नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी या विरोधात खंबीर भूमिका घेतल्याने डिजिटल फलकांची गर्दी करणा-या मंडळींनी धसका घेतला आहे.
शहरात पार्क चौक- डॉ. आंबेडकर पुतळा परिसर, चार हुतात्मा पुतळा परिसर, रेल्वे स्थानक, सात रस्ता, पांजरापोळ चौक – एसटी बस स्थानक परिसर, भया चौक, टिळक चौक, अशोक चौक, सम्राट चौक – डॉ. आंबेडकर उद्यान परिसर या नऊ ठिकाणी ‘नो डिजिटल झोन’ आहे. परंतु याच परिसरात मोठमोठाले डिजिटल फलक उभारले जातात. सध्या यापकी ब-याच ठिकाणी डिजिटल फलकांची गर्दी दिसून येते. त्याची दखल घेऊन आयुक्त गुडेवार यांनी, हे डिजिटल फलक संबंधितांनी तातडीने काढून टाकावेत, अन्यथा १ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. डिजिटल फलक उभारण्यासाठी नवे नियम देखील त्यांनी जाहीर केले आहेत. व्यापा-यांच्या दुकानासमोर, खासगी मिळकतदारांच्या घरासमोर दमबाजी करून डिजिटल लावले जातात. यापुढे संबंधित व्यापारी, घरमालकांचे संमतीपत्र व पोलिसांची परवानगी असल्याशिवाय डिजिटल फलक उभारता येणार नाहीत. डिजिटल फलकांच्या परवान्यासाठी पाच दिवस अगोदर अर्ज करावे लागेल. वाढदिवसाच्या डिजिटल फलकाला जास्तीत जास्त पाच दिवस तर सण-उत्सवानिमित्त उभारल्या जाणा-या डिजिटल फलकाला दहा दिवस परवानगी मिळेल, ३०० चौरस फुटापेक्षा मोठे डिजिटल फलक लावता येणार नाहीत, डिजिटल फलक जमिनीपासून दहा फूट उंचीवर असावे, डिजिटल फलकावर परवाना क्रमांक आणि िपट्रर्सचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे.