आधीचे पालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या कडक शिस्तीपुढे नांगी टाकणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची मागणी गुंडाळणारे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याविरोधात व्यूहरचना केली आहे. आयुक्तांच्या वाटेत काटे पेरण्यासाठी महापौरांपासून नगरसेवकांपर्यंत सर्वाना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आदेशवजा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयुक्त सीताराम कुंटे यांचा प्रशासकीय प्रवास खडतर ठरण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अन्त्यसंस्कार करण्यात आले, त्याच जागी त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती. तसेच अन्त्यसंस्कारासाठी बांधलेला चौथरा पालिकेकडून पाडण्यात येऊ नये यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस तेथे पहारा देत होते. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला एक महिना पूर्ण होताच कडेकोट पोलीस बंदोबस्तात पालिकेने तो चौथरा काढून मैदान पूर्ववत केले. शिवाजी पार्कचे ‘शिवतीर्थ’ नामकरण करण्याचा प्रस्तावही शिवसेनेच्या अंगलट आला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष खदखदू लागला होता आणि शिवसेना नेतेही अडचणीत आले होते.
नागरी कामांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे विलंबाने सादर करणे, निविदा प्रक्रियांमध्ये विलंब करणे, आदींमुळे सत्ताधारी शिवसेनेची कोंडी होऊ लागली आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचू लागले असून घरगल्ल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. अनेक ठिकाणी मलवाहिन्यांतील सांडपाण्याचे ओघळ रस्त्यांवर पाहत आहेत. खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा आदींमुळे नागरिकांचा रोष नगरसेवकांना पत्करावा लागत आहे. त्यामुळे आता असहकाराची भूमिका घेऊन पालिका आयुक्तांची कोंडी करण्याचे आदेश थेट ‘वरून’च नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
पालिका सभागृहासह सर्व वैधानिक समित्या, प्रभाग समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमकपणे प्रशासनाच्या विरोधात भूमिका मांडावी, असेही नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या फौजेमध्ये सध्या अभ्यासू नगरसेवकांची संख्या रोडावली आहे. त्यातच राजकारणात नवख्या नगरसेविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून पालिका आयुक्तांना गारद करण्याची चाचपणी शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा