विनापरवाना शहरात लावण्यात आलेली ४८ होर्डिग्ज पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी हटविल्याचा दावा केला असला तरी ऐरोली, दिघ्यात अनेक व्यक्ती, संस्था व व्यावसायिकांचे बेकायदा होर्डिग्ज झळकत असून याबाबतीत आयुक्तांच्या लेखी आदेश धाब्यावर बसविण्यात आले असल्याचे दिसून आले.
मुंबई उच्च न्यायालयाने होर्डिग्ज हटावचे आदेश देऊनही नवी मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिग्ज बिनधास्त झळकत असल्याचे दिसून येते. पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी गुरुवारी या संदर्भात सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिले आहेत. तरीही दिघा आणि ऐरोली प्रभाग क्षेत्रांत अनेक बेकायदा होर्डिग्ज झळकत आहेत. यात दिघा, इलटणपाडा, चिंचपाडा झोपडपट्टीत तर या अनधिकृत होर्डिग्जनी धुडगूस घातला आहे. प्रभाग अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. काही दिवसांपूर्वी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची एक यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात एसईओ झालेल्या चमकेशबहाद्दरांनीदेखील होर्डिग्जद्वारे आपल्या पदाची जाहिरात सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काही खासगी टय़ुशन क्लासेसनी जाहिरातबाजी सुरू केली आहे, पण हे फलक काढण्याचे सौजन्य पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेले नाही. गुरुवारपासून ४८ होर्डिग्ज हटविण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुभाष गायकर यांनी दिली, मात्र दिघा ऐरोली विभागात अद्याप कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच दोन विभागांत होर्डिग्जबाजी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. काही सोसायटींनी आपल्या जागा होर्डिग्जसाठी विकल्या आहेत. त्याचप्रमाणे काहींनी त्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंधण दिल्या आहेत. त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात असून सोसायटी पालिकेच्या परवानगीशिवाय अशा जागा देऊ शकत नाही, असे गायकर यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा