शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अशुध्द पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली व तेथील निष्क्रिय अधिका-यांची ‘बिनपाण्याने खरडपट्टी’ काढली. शुध्द पाणी देता येत नसेल तर पालिकेत सेवा न करता घरी बसा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा शब्दात आयुक्तांनी अधिका-यांना सुनावले.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो. याशिवाय टाकळी येथील भीमा नदीवरील औज बंधाऱ्यातून तसेच हिप्परगा जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. औज बंधाऱ्यातून उपसा केलेले पाणी सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्द केले जाते. गेल्या काही दिवसांपासून औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावून ती १.७० मीटपर्यंत गेल्यामुळे पाण्याबरोबर शेवाळे, माती येत असल्याने पाणी गढूळ होत आहे. शुध्दीकरण होऊनदेखील पाणी दूषित व त्यातील गढूळपणा कायम दिसून येतो. पाण्याला पिवळा रंगही चढला आहे. या गढूळ व दूषित पाण्याच्या पुरवठय़ामुळे सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
या तक्रारींची नोंद घेऊन पालिका आयुक्त गुडेवार यांनी बुधवारी सकाळी सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्राला अचानक भेट दिली. तेथील प्रयोगशाळा, जलशुध्दीकरणाची यंत्रसामुग्री, प्रक्रिया केंद्राची पाहणी केली असता तेथील दुरवस्था प्रकर्षांने प्रकाशात आली. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी संताप व्यक्त करीत पालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड व सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्राचे प्रमुख रवींद्र गायकवाड व रूपाली इंडे यांना फैलावर घेतले. विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे आयुक्त संतप्त झाले. शुध्द पाण्याचा दावा करणाऱ्या अधिका-यांची त्यांनी कानउघाडणी केली. तुम्हाला शुध्द पाणी देता येत नसेल तर सेवेत न थांबता थेट घरचा रस्ता पकडा, अशा शब्दात गुडेवार यांनी खडेबोल सुनावल्याने अधिका-यांची पाचावर धारण बसली. जलशुध्दीकरणासाठी खासगी कंपनीबरोबर केलेल्या कराराप्रमाणे कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतचा पाठपुरावाही होत नसल्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Story img Loader