समृद्ध, संपन्न व प्रकाशमय भारताचे निर्माते व्हा, असा कानमंत्र महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इसा’ या विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थी संघटनेच्या उद्घाटनाचे. अनौपचारिक पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हस्के यांनी विद्युत निर्मितीचा सगळा इतिहास उलगडून सांगितला.
औद्योगिकीकरण व वाढत्या गरजा, मागणी व पुरवठा यातील तफावत याची जबाबदारी अभियंत्यांवर आहे. या साठी दूरदृष्टी, नवनिर्मिती व सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेऊन अभियंत्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि भारताला समृद्ध, संपन्न व प्रकाशमय करावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, जीटीएलचे महाव्यवस्थापक सय्यद शहा यांनी औरंगाबादला करण्यात येणाऱ्या वीजपुरवठय़ाच्या तांत्रिक बाजू, समस्या, उपाययोजना व नवीन तंत्रज्ञानाबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्य विद्युत मंडळाच्या औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांचे कार्यकारी अभियंता एम. बी. बनसोडे यांनी विद्युत क्षेत्रातील तीव्र स्पर्धामुळे विश्वासार्हता, तसेच कमीत कमी दरात वीजनिर्मिती आपल्यासमोर आव्हान असल्याचे नमूद केले. एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटीचे कोषाध्यक्ष जिब्रान काद्री यांनी जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे अथक प्रयत्नातून, जिद्दीतून विद्यार्थ्यांना सोने करावे, असा सल्ला दिला.
प्राचार्य प्रा. एस. के. बिरादार यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे विश्वस्त डॉ. उमर काद्री, विद्युत विभागप्रमुख प्रा. मोहम्मद इर्शाद, प्रा. राहुल शेळके, प्रा. कृष्णा बिरादार, प्रा. संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा