महापालिका कौन्सिल हॉलच्या आगीबाबत चौकशी समितीने विद्युत विभागाचे प्रमुख बाळासाहेब सावळे व अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्यावर ठपका ठेवला आहे. आग कशामुळे लागली ते गुलदस्त्यातच ठेवून आग विझवण्यात अकार्यक्षमता दिसली असा निष्कर्ष समितीने काढला असून सावळे व मिसाळ यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत केली आहे.
आग विझवताना पाण्याचा बेसुमार वापर झाला, त्यामुळे इमारत धोकादायक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यातील काही तज्ञ संस्थांकडून याची पाहणी करावी व त्यानंतरच हॉलच्या पुर्ननिर्माणाचा विचार करावा, तोपर्यंत इमारतीतील कार्यालयांचे स्थलांतर करून संपूर्ण इमारत पॉलिथिन किंवा अन्य प्रकारे झाकून ठेवावी असे अहवालात सुचवण्यात आले आहे.
समिती स्थापन करताना आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आग कशामुळे लागली त्याचाही शोध समिती घेईल असे स्पष्ट केले होते. मात्र समिती त्या निष्कर्षांपर्यंत पोहचलेलीच नाही. हॉलच्या गॅलरीत असलेल्या पाण्याचा कुलर व तेथील स्विच बोर्ड यामुळे आग लागलेली असू शकते असे समितीने म्हटले आहे. मात्र विद्यूत विभागप्रमुख सावळे यांनी हॉलमधील वायरिंग धोकादायक झालेली असतानाही लक्ष दिले नाही, वेळोवेळी वायरिंगची तपासणी करण्याची गरज असताना तशी तपासणी केली नाही, आवश्यक त्या ठिकाणी स्विच बोर्ड, वायरिंग बदलेले नाही असा ठपका ठेवण्यात आला आहे.
आग लागली एका बाजूने व ती विझवण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्या बाजूने असेही समितीने नमूद केले आहे. अग्निशमन विभागाच्या गाडय़ांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था नव्हती. गाडय़ा संख्येने कमी होत्या. इतर संस्थांच्या अग्निशमन केंद्रांबरोबर समन्वय नव्हता, त्यांच्याशी संपर्क साधण्यास विलंब झाला. आग विझवण्यासाठीच्या इतर उपकरणांचा व्यवस्थित वापर झाला नाही. कर्मचारी प्रशिक्षित नव्हते अशी कारणेही समितीने दिली असून त्यासाठी शंकर मिसाळ यांना जबाबदार धरले आहे.
काही उपाययोजनाही सुचवण्यात आल्या असून त्यात प्रामुख्याने अग्निशमन विभाग सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या किमान ३ गाडय़ा घ्याव्यात, पाणी भरण्याची व्यवस्था करावी, आधुनिक उपकरणांची खरेदी करावी, कर्मचाऱ्यांना यासाठीचे खास प्रशिक्षण द्यावे, विभागाची गाडी कोणत्याही कार्यक्रमासाठी दिवसभर देऊ नये, मनपाच्या नव्या व जुन्या इमारतींचे फायर ऑडिट करून घ्यावे असे सुचवण्यात आले आहे.
उपमहापौर गीतांजली काळे, पत्रकार प्रकाश भंडारे, अन्य नागरिक, मनपाचे कर्मचारी, विद्युत निरीक्षक कार्यालयाचे लेखी मत यांच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आयुक्त कुलकर्णी यांनी आज सकाळी महापौर शीला शिंदे व अन्य पदाधिका-यांना सुरुवातीला अहवालाची माहिती दिली व नंतर त्याविषयी पत्रकारांना सांगितले. दोन विभागप्रमुखांची विभागीय चौकशी तसेच अहवालात सुचवण्यात आलेल्या अन्य बाबींसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा