नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने निमा हाऊस येथे आयोजित बैठकीत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी समिती स्थापन करण्यात आली.
याप्रसंगी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, निमाचे मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, नरेंद्र हिरावत, विवेक गोगटे, प्रदीप बूब आणि ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलींद राजपूत यांच्यासह लघु, मध्यम व मोठय़ा उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्लस्टर समितीसाठी अजूनही सहभाग नोंदविता येणार असून समितीत मिलींद राजपूत, हर्षद ब्राह्मणकर, आदित्य गोगटे, मिलींद चिंचोलीकर, एस. एम. गंगातीरकर, डी. आर. सोनार, के. बालचंद्रन, सुनील बागूल, शैलेश नारखेडे, एम. जी. कुलकर्णी, राजन शहा आदिंचा समिती सदस्य म्हणून समावेश आहे.
याप्रसंगी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्तविकात नाशिकमधील इलेक्ट्रिकल उद्योगांच्या विकासासाठी ‘निमा पॉवर’ सारख्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, अशी माहिती दिली. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर स्थापन करण्यासंदर्भात निमा प्रयत्नशील आहे. क्लस्टर स्थापनेसंदर्भात शेवटच्या टप्प्यात काम सुरू आहे. अनेक मोठय़ा व मध्यम उद्योगांनी क्लस्टर स्थापनेच्या प्रक्रियेत आर्थिक तसेच तांत्रिक सहभागाविषयी उत्साह दाखवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील व सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव यांनी नाशिक, मालेगाव पाठोपाठ त्र्यंबक, सुरगाणा, पेठ भागातूनही वेगवेगळ्या उत्पादनांचे क्लस्टर स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे सांगितले. नाशिकमधील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रिजची संख्या पाहता या प्रकारच्या कंपन्यांची वाढ कुठेतरी खुंटली असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे हे क्लस्टर नाशिकमध्ये स्थापन करण्याची गरज असून नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व नाशिक जवळील जिल्ह्य़ातील उद्योगांनाही याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर विविध इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या प्रतिनिधींकडून त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या चाचणीच्या प्रकाराचे नाव तसेच साधारणत: वर्षभरात त्यावर होणारा खर्च, लागणारा वेळ याविषयी माहिती घेण्यात आली. या क्लस्टरमध्ये अधिकाधिक उद्योग समूहांना त्याचा उपभोग घेता यावा या दृष्टिकोनातून चाचणी सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन मिलींद राजपूत यांनी केले. आभार मंगेश पाटणकर यांनी मानले. क्लस्टरसंदर्भात चर्चेसाठी आठवडय़ाच्या प्रत्येक सोमवारी निमा येथे बैठक  होणार आहे.