शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहरात भव्य स्मारक उभारण्याच्या दृष्टीने दिलेल्या आश्वासनाची तीन महिने उलटूनही पूर्तता होत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत महापौरांना धारेवर धरले. अखेर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी स्मारक उभारण्यासाठी सर्वपक्षीय गट नेत्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात येत असल्याचे जाहीर करून एक एप्रिल रोजी ही समिती जागांची पाहणी करणार असल्याचे नमूद केले. दरम्यान, एका खासगी उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी पालिका इमारतीचा एक संपूर्ण मजला देण्यास भाजपच्या नगरसेविका प्रा. देवयांनी फरांदे यांनी केलेला विरोध डावलून संबंधित संस्थेला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी सकाळी महापौर अ‍ॅड. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेचे कामकाज शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या मुद्यावरून प्रारंभीच तापले. माजी महापौर विनायक पांडे, शिवाजी सहाणे, शैलेश ढगे आदी नगरसेवकांनी कामकाज सुरू होण्याआधी या विषयावरून महापौरांना जाब विचारला. शिवसेनाप्रमुखांचे शहरात स्मारक शहरात उभारण्यात यावे, अशी मागणी आधीच करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी खुद्द महापौरांनी त्यास संमती देऊन त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याचे मान्य केले होते. तथापि, तीन महिन्यांचा कालावधी होऊनही त्या दिशेने कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याचा आक्षेप सेना नगरसेवकांनी नोंदविला. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी समिती गठीत करून जागांची पाहणी करून योग्य जागेची निवड करण्याचे महापौरांनी आश्वासन दिले होते. परंतु, त्याची अद्याप पुर्तता झाली नसल्यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभेच्या प्रारंभीच हा गोंधळ उडाल्याने महापौरांनी या समितीचे गठण झाल्याचे सांगून त्यात सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या समितीत स्मारकासाठी आवश्यक त्या सल्लागारांचा समावेश केला जाणार असल्याचे अ‍ॅड. वाघ यांनी सांगितले. शहरात पालिकेच्या तीन ते चार जागांचा प्राथमिक विचार सुरू आहे. या समितीच्यावतीने त्या जागांची १ एप्रिल रोजी पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महापौरांच्या या निवेदनामुळे सभागृहातील गोंधळ शमला आणि प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली.
जुन्या नाशिक परिसरातील रहेबर ए तालीम कमिटी संचलित रहेनुमा उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेला पालिकेच्या मौलाना आझाद उर्दु शाळेच्या इमारतीतील एक मजला देण्याच्या विषयावरून मनसे आणि भाजपच्या सदस्यांमध्ये मतभेद झाले. माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांनी या पद्धतीने पालिकेच्या जागा कोणत्याही संस्थेला देऊ नका, ही खासगी संस्था असून ती डोनेशन व शुल्क घेऊन शिक्षण देते. त्यामुळे पालिकेची जागा देऊन कोणताही उपयोग होणार नसल्याचे सांगितले. तथापि, मनसेच्या सदस्यांनी आक्रमक होत यापूर्वी अनेक बडय़ा संस्थांना नाममात्र दरात जागा दिल्याची आठवण करून दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या संस्थेला दिल्या गेलेल्या जागेचाही उल्लेख करण्यात आला. या विषयावर मतदान घेऊन निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु, महापौरांनी सभागृहाचा कल लक्षात घेऊन संबंधित संस्थेला जागा देण्यात येत असल्याचे जाहीर केले. विषय पत्रिकेतील इतर विषयांवर सायंकाळी उशिरापर्यंत याच पद्धतीने चर्चा सुरू होती.

Story img Loader