जगात भ्रष्टाचार सर्वव्यापी आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांनाही भ्रष्टाचाराने पोखरले आहे. मात्र, त्यांचा भ्रष्टाचार वरिष्ठ पातळीवरचा आहे, भारतात मात्र सामान्य माणसाशी तो निगडीत असून त्यालाच या भ्रष्टाचाराची झळ बसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘युवकांची राष्ट्रबांधणीत भूमिका’ या विषयावरील व्याख्यानमालेचे उद्घाटन आज श्री. हजारे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, विश्वस्त सीताराम खिलारी, दिपलक्ष्मी म्हसे, महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. राजू, प्रा. एन. एम. तांबे आदी यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, देशातील भ्रष्टाचाराने महागाईवर थेट परिणाम केला असून दिवसागणिक त्यात वाढच होत आहे. इतर देशांत भ्रष्टाचार असला तरी त्यांची स्थिती अशी नाही. देशांतर्गत भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेली लढाई सर्वार्थाने युवकांवर अवलंबून आहे. संसद सदस्यांपैकी १६३ जण गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. कायदे करणारेच असे असतील तर जनतेच्या पदरात काय पडणार; असा सवाल हजारे यांनी केला. मी प्रपंच केला नाही, पण तुम्ही माझे अनुकरण करू नका. मात्र देशाचे आपण देणे लागतो, याची खुणगाठ मनाशी पक्की करा, त्यानुसार सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून आचरण करा, असे भावनिक आवाहन हजारे यांनी केले.
जनता हीच देशाची मालक आहे, मात्र मालकच झोपल्याने देशाची तिजोरी रिकामी झाली हे लक्षात घ्या, असे सांगून हजारे म्हणाले, जनतेच्या हितासाठीच आपली लढाई सुरू आहे. भ्रष्टाचाराविरूध्द याआधीही आपण अनेक यशस्वी लढे दिले, त्यात प्रामुख्याने देशभरातील वकिलांची साथ आपल्याला लाभली. आताही नवे राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत असताना अनेक वकील देशभरातून या जनआंदोलनाशी जोडले जात आहेत. विविध कायद्यांच्या दुरूस्तीसाठी त्याचा या आंदोलनाला मोठा लाभ होणार आहे. यामागील सामाजिक भावना लक्षात घेऊन विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन हजारे यांनी केले. राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावरही हजारे यांनी जोरदार टीका केली. या मुद्दय़ावर सर्वच पक्ष एक आहेत असे सांगून त्यांना एवढय़ा देणग्या देतोच कोण, असा सवाल त्यांनी केला. भ्रष्टाराचे मूळच निवडणुकीच्या राजकारणात आहे, असे म्हणाले. श्री. झावरे यांचेही यावेळी भाषण झाले. प्राचार्य राजू यांनी प्रास्ताविक केले.