गिरीश कुबेर यांचे मत
अलीकडेच सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा निर्गुण आणि निराकार असून सामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर ‘एक शून्य’ अशा शब्दात देता येईल, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी येथे केले. ठाणे भारत सहकारी बँकेच्या वतीने सहयोग मंदिर सभागृहात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१३-१४’चे कुबेर यांनी विस्तृत विवेचन केले.   
या अर्थसंकल्पातून ‘मला काय मिळाले?’ याच्यापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेला किती फायदा झाला, या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला हवे असे सांगत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अर्थसंकल्प मांडताना राजकीय चातुर्याचा उपयोग केला असल्याचे मत कुबेर यांनी मांडले.
 चिदम्बरम यांनी अर्थमंत्री झाल्यापासून अनेक खात्यांच्या नियोजित खर्चाना कात्री लावली असून बचत रकमेचा उपयोग चालू वर्षांसाठी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्तावित तरतुदींनुसार सरकारचा नियोजित खर्च ५.२१ लाख कोटी रुपये असणे अपेक्षित होते; परंतु सुधारित तरतुदींनुसार हा खर्च ४.२९ लाख कोटी रुपये इतकाच आहे. यामुळे यंदाच्या वर्षांत १८ टक्क्यांची काटकसर करून पुढील वर्षांचा प्रस्तावित खर्च ५.५५ लाख कोटी रुपये इतका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्ष हे निवडणुकांचे असल्याने अतिरिक्त रक्कम निवडणूकपूर्व खर्चासाठी शिल्लक ठेवण्यात आल्याचे कुबेर यांनी सांगितले.  
विकास दर वाढविण्याबरोबरच वित्तीय तुटीचा दर कमी करावा लागणार आहे. महागाई निर्देशांकाशी निगडित नवीन एखादी रोखे योजना सुरू करून सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीस पर्याय देण्याचा पर्याय देण्यात येईल. र्निगुतवणूक व दूरसंचार ध्वनिलहरींच्या लिलावातून चार पैसे मिळतील, अशी आशा सरकार बाळगून आहे. खर्चात फक्त ४ टक्के वाढ होईल, असे दाखविले आहे. मात्र जीडीपी व चलनवाढ जास्त असेल तर खर्च कसा कमी होईल, असा प्रश्नही कुबेर यांनी उपस्थित केला.  व्याख्यानानंतर कुबेर यांनी उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्रीराम दाते यांनी मानले.

Story img Loader