प्रार्थना स्थळावरील विद्युत रोषणाईत बिघाड केल्याचे निमित्त होऊन शहराच्या तांबापुरा भागात मंगळवारी रात्री उसळलेली दंगल त्वरीत नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा दगडफेकीचे प्रकार घडण्यामागे पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत झाल्याचे म्हटले जात आहे. वर्षभरात सुमारे दहा दंगलींचा साक्षीदार बनलेल्या या भागातील दोन समाजांमधील धग दूर करण्यासाठी राजकारण्यांकडून प्रयत्न होत नसल्याचेही दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तांबापुरा या संवेदनशील भागातील प्रार्थना स्थळावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईत काही लहान मुलांनी बिघाड करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलांना काही जणांनी समजाविण्याचा प्रयत्नही केला. घडलेला प्रकार मुलांनी घरी जाऊन सांगताच मोठा जमाव बिस्मिल्ला चौकात जमा झाला. दुसऱ्या बाजूनेही वादावादीस सुरूवात झाली. वाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर दंगलीत होऊन दगडफेक करण्यात आली. दगड मारून पथदीवे फोडून परिसरात अंधार करण्याचा प्रयत्न झाला. हाणामारीत दगड आणि विटांचा सर्रास वापर करण्यात आला. हातगाडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करण्यात आले. घटनास्थळी त्वरीत दाखल झालेल्या पोलिसांनाही दगडांचा मारा सहन करावा लागला. त्यात दोन पोलीस जखमी झाले.
रात्रीच्या घटनेनंतर परिस्थिती निवळल्याचे दिसत असतानाच बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा दगडफेकीचे काही प्रकार घडले. या दोन दिवसातील प्रकारात पाच पोलिसांसह १२ जण जखमी झाले. पोलिसांनी ३८ जणांना ताब्यात घेतले. असे असले तरी, नेहमी दंगलीस आमंत्रित करणाऱ्या मूळ कारणांचा शोध घेतला जात नाही. तोपर्यंत हे असेच सुरू राहणार असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
गैल्या दोन वर्षोपासून या भागातील काही राजकारण्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून या दंगली घडविल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तांबापुरा आणि मेहरूण हा भाग अतिसंवेदनशील असल्यामुळे सण किंवा उत्सवप्रसंगी या भागात अधिक बंदोबस्त नेमण्याची गरज असते. परंतु मंगळवारी विशेष बंदोबस्त नव्हता असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे रात्री दगडफेकीचे प्रकार झाल्यानंतरही या ठिकाणी केवळ चार-पाच पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी टाकण्यात आली होती, असे म्हटले जाते. त्यामुळे या दंगलीतील नुकसानीची जबाबदारी काही प्रमाणात पोलिसांवरही जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा