शहरातील १४ रस्त्यांसाठी काढलेल्या ३१ कोटी ३८ लाख रुपयांच्या निविदा भरण्यासाठी औरंगाबाद विभागातील कंत्राटदारांनी नकार दिला. परिणामी महापालिकेची कोंडी होण्याची शक्यता आहे. तब्बल ५० कोटींची ठेकेदारांची देणी न दिल्याने रस्त्यांची कामे घेणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. या अनुषंगाने स्थायी समितीच्या सभेत सोमवारी चर्चा झाली. या निविदा ई-स्वरूपात उपलब्ध असल्याने अन्य विभागातील ठेकेदार या निविदा भरतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामावरून अजूनही गोंधळ सुरूच असल्याचे स्पष्ट झाले.
शहरातील सुमारे २० किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यासाठी निविदा प्रस्तावित असून ८ जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे. मात्र, महापालिकेकडे नोंदणी झालेल्या ३३ पेक्षा अधिक ठेकेदारांनी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे न करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामाची देयके देण्यात आली नाहीत. देयके दिली जातील. मात्र, केवळ याच ठेकेदारांवर महापालिका अवलंबून नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील भटक्या कुत्र्यांवरही समितीत चर्चा करण्यात आली. नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी कुत्र्यांपासून होणारा त्रास सभापती नारायण कुचे यांच्यासमोर मांडला. या बाबत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. कुत्र्यांच्या लसीकरणासाठी दोन सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून दररोज किमान १५ कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दिवसभरात ३० कुत्र्यांचे लसीकरण व्हावे, असे अपेक्षित असते. नोव्हेंबरात ५७१ भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे लसीकरण केल्याची माहिती स्थायी समिती सभेत देण्यात आली. वर्षभरातील कुत्र्यांच्या लसीकरणाची संख्या ३ हजार ६३४ असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा