अकोला जिल्हा परिषदेच्या हरिहर पेठ माध्यमिक शाळेतील विलास नामदेव शेगोकार (४५) या वरिष्ठ सहाय्यकांनी काल विष प्राशन करून आत्महत्या केली. विलास शेगोकार यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. या घटनेनंतर आज दुपारी जिल्हा परिषदेत विलास शेगोकार यांचा मृतदेह आणण्यात आला. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा व विलास यांच्या पत्नीला नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी त्यांच्या परिवाराने लावून धरली होती. यावेळी झालेला गोंधळ सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नियंत्रणात आणला. यावेळी मोठय़ा संख्येत जिल्हा परिषदेत सदस्य व इतर जमाव एकत्र आला होता.
अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या हरिहर पेठेतील माध्यमिक शाळेत विलास नामदेव शेगोकार (रा.श्रध्दा कॉलनी, अकोला) नोकरीस होते. काल त्यांनी येथील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगरकर शाळेजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली. या ठिकाणी पोलिसांना विलास शेगोकार यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत शाळेतील एक महिला परिचर, सहाय्यक शिक्षक एस.टी.राऊत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी मानसिक त्रास देऊन छळल्याचा आरोप केला आहे, तसेच या सर्वांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही चिठ्ठीत करण्यात आली होती. निलंबित केल्यानंतर खोटय़ा प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी दोन ते दहा लाखांची लाच मागितल्याचा आरोपही यात करण्यात आला. बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून विलास शेगोकार यांनी आत्महत्या केल्याचे चित्र होते.
आज त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर विलास शेगोकार यांचा मृतदेह जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर ठेवण्यात आला. विलास यांचे मित्र व काँग्रेस नेते डॉ.सुधीर ढोणे, गजानन भटकर व शेगोकार यांच्या परिवारातील लोकांनी दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करा व विलास यांच्या पत्नीला कायमस्वरूपी जिल्हा परिषदेच्या नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली. अशीच मागणी जिल्हा परिषदेतील काही सदस्यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेत झालेला गोंधळ पाहता सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी मोठय़ा संख्येत जिल्हा परिषदेत सदस्य व इतरांचा जमाव झाला होता.
दरम्यान, या प्रकरणाची तत्काळ दखल जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी घेतली. त्यांनी शेगोकार यांच्या पत्नीस जिल्हा परिषदेत नोकरीत घेण्याबाबत राज्य शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ पाठविणार असल्याचे आश्वासन दिले. तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आत्महत्येस जबाबदार असलेल्या सर्वावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर विलास शेगोकार यांचा मृतदेह हलविण्यात आला. या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेत बऱ्याच काळ तणावाचे वातावरण होते.
विलास शेगोकारांचा मृतदेह जि. प.त आणल्याने गोंधळ
अकोला जिल्हा परिषदेच्या हरिहर पेठ माध्यमिक शाळेतील विलास नामदेव शेगोकार (४५) या वरिष्ठ सहाय्यकांनी काल विष प्राशन करून आत्महत्या केली. विलास शेगोकार यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
First published on: 23-03-2013 at 03:50 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commotion when dead body of vilas shegokar brought in district council office