विविध कारणास्तव वैद्यकीय क्षेत्रावर असलेला विश्वास काहीसा डळमळीत होत आहे. अवास्तव बील, अनावश्यक तपासण्या, काही कारणास्तव रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये होणारा विसंवाद या घटनांमुळे रुग्ण व डॉक्टर यांच्यात दरी निर्माण झाली आहे. या विषयावर सकारात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने युनिव्‍‌र्हसल हेल्थ केअर आणि शहर परिसरातील सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर-रुग्ण संवाद फोरम स्थापन करण्यात येणार आहे.
मनोविकास प्रकाशनाच्यावतीने डॉ. अरूण गद्रे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील विदारक अनुभव तसेच सद्यस्थितीवर भाष्य करणारे ‘कैफियत’ हे पुस्तक प्रकाशित झाले. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवा ही विक्री वस्तु बनली आहे. वैद्यकीय सेवा वस्तु न राहता ती सेवा व्हावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तपासणीच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची ओरड होते. काही वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी केल्या जातात. त्यामुळे देव समजल्या जाणाऱ्या डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीच्याही घटना घडत आहेत. दुसरीकडे विविध विमा कंपन्याकडून आरोग्य व्यवस्थेवर अतिक्रमण होऊन विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांची लूट होत आहे. या सर्व परिस्थितीवर वैचारिक मंथन व्हावे तसेच काही सकारात्मक बदल व्हावे या दृष्टीने ‘कैफीयत’वर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी एका शिष्टमंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. ज्या मंडळात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह समाजातील विविध स्तरातील लोकांचा समावेश असेल. हे मंडळ मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे सरकारने युएचसीबद्दल एक टास्क ग्रुप तयार करावा असे साकडे घालणार आहे. आवाहन करेल. तसेच ‘डॉक्टर-रुग्ण’ संवाद फोरम स्थापन करून संवादासाठी कार्यक्रम करणे, रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या आरोग्य व्यवस्थेत करावयाच्या सुधारणा, शास्त्रीय, नैतिक उपचार पध्दती याबाबत प्रबोधन करण्यात येईल. या चर्चासत्रात वैचारिक मंथन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. गद्रे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. गद्रे (९८२२२ ४६३२७), डॉ. अभय शुक्ला (९४२२३ १७५१५) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा