लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सर्वच पक्षांच्या वतीने दुष्काळाचे निमित्त साधून विविध उपक्रमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असताना संघटनात्मक पातळीवर अतिशय बिकट अवस्थेत पोहोचलेल्या शिवसेनेत एखादा अपवाद वगळता तशी शांतताच. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि पक्षात जान फुंकण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांचे अखेर नाशिककडे लक्ष गेले असून नूतन संपर्कप्रमुखांचा दोनदिवसीय संवाद दौरा हा त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निमित्ताने शिवसैनिकांपासून ते आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वाशी संवाद साधला जाणार आहे. इतकेच नव्हे तर, नाराज झालेल्या मंडळींशी हितगुज साधून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मनसेच्या दणक्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून शिवसेनेचा सुरू झालेला पराभवाचा सिलसिला विधानसभा, विधान परिषद आणि पाठोपाठ महापालिका निवडणुकीपर्यंत सुरू राहिला. या पाच वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यशैलीला वैतागून स्थानिक पातळीवरील अनेक प्रमुख मोहऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. सेनेच्या वाघाची डरकाळी नाशिकमध्ये क्षीण होत असताना शह-काटशहाचे राजकारण, पक्षप्रमुखांनी केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्याचा प्रकार, जिल्हाप्रमुखांचे स्वतंत्र संस्थान तर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे वेगळेच साम्राज्य, कुणाचा कुणाला पायपोस नाही, असे चित्र दिसत असल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात महागाई, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्दय़ांवर एकही मोठय़ा स्वरूपाचे आंदोलन सेनेला हाती घेता आले नाही. पक्षाची अवस्था खालावत असूनही वरिष्ठांना त्याचे सोयरसुतक आहे की नाही, अशी शंका वाटण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱ्या नाशिक जिल्हय़ाची ओळख कधीच इतिहासजमा झाली. एकीकडे मनसे अगदी पद्धतशीर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाय पसरत असताना सेनेच्या धुरिणांना काय करावे अन् काय करू नये सुचेनासे झाले. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे वरिष्ठ नेतृत्वास नाशिककडे फारसे गंभीरपूर्वक पाहण्याची सवडच मिळाली नाही. मुंबईहून नाशिककडे लक्ष देण्यासाठी ज्यांची, ज्यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड केली गेली, त्यांच्या काळात अंतर्गत वाद कमी होण्याऐवजी वाढतच गेले. या सर्व घडामोडींचा परिणाम संघटना स्थानिक पातळीवर अधिकाधिक विकलांग होण्यात झाला आहे. महापालिकेत सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीशीही वाटाघाटी करणाऱ्या शिवसेनेने आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत थेट मनसेला पाठिंबा देत एक पक्ष म्हणून निर्णयात कसा कोणत्याही प्रकारचा ठामपणा नाही हे दाखवून दिले.
या सर्व पाश्र्वभूमीवर, नूतन संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या आगामी दोनदिवसीय दौऱ्याकडे पाहावे लागेल. २६ व २७ एप्रिल या कालावधीत मिर्लेकर हे नाशिकमधील समस्त शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना संवादाची वाटलेली गरज ही उपरती म्हणता येईल. शिवसैनिकांशी नाळ तुटल्यामुळे पक्ष संघटनेचा ऱ्हास झाल्याचे त्यांच्याही लक्षात आले असावे. यामुळेच की काय, दोनदिवसीय दौऱ्यात संवादाचा एककलमी कार्यक्रम राहणार आहे. महापालिकेच्या निकालानंतर म्हणजे सव्वा वर्षांपासून शिवसेनेला महानगरप्रमुख व जिल्हय़ाची कार्यकारिणी लाभलेली नाही.
मध्यंतरी विभाग पातळीवरील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या विलंबामागे दिले जाणारे कारणही मजेशीर आहे. एकेका पदासाठी दहाहून अधिक जण इच्छुक असल्याने पद कोणाला द्यायचे, असा प्रश्न वरिष्ठांना पडल्याचे सांगितले जाते. इच्छुकांची इतकी संख्या असेल तर कोणत्याही पक्षाला हर्षवायूच व्हावयास हवा. मिर्लेकर यांच्या दौऱ्यात प्रामुख्याने संघटनात्मक बांधणीविषयी चर्चा केली जाणार आहे.  जिल्हय़ातील एकूण राजकीय परिस्थिती, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना हे विषयही त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर राहणार असल्याचे सांगण्यात येते. नाशिकची शिवसेना मिर्लेकरांना नवीन नाही. खाचखळग्यांची त्यांना जाणीव आहे. त्यांना परिचित काही जुने चेहरे आता विरोधी पक्षात गेलेले असताना काही नवीन चेहऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.   

Story img Loader