युवकांना निवडणूक व स्वार्थी राजकारणापायी व्यसनाधीन बनवून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचे काम प्रस्थापित राजकीय पक्ष करीत असल्याचा  आरोप  आम आदमी पार्टीचे कमांडर अशोक राऊत यांनी येथे केला.
चिखली येथील बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे जिल्हा मागासलेला राहिलेला आहे. हा कलंक पुसण्यासाठी जिल्ह्य़ात शेतीवर आधारित उद्योगधंदे निर्माण करण्याची गरज असून पर्यटन, तसेच विकास साधण्यासाठी खामगांव-जालना महामार्गाचे काम पूर्णत्वास नेऊन शेतमाल मोठय़ा शहरात नेण्याची व्यवस्था करणे गरजेचे ठरते.
दळणवळणाची साधणे उपलब्ध करून द्यावी लागेल. यासाठी आम आदमी  पार्टी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्थापित राजकीय पक्षांनी केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी कार्यकर्ते पोसले आहे.
जनतेच्या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या विरोधात देशातील जनतेमध्ये रोष खदखदत असून देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. कॉंग्रेस, शिवसेना हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांनी भ्रष्टाचार करून स्वत:चे पोट भरण्याचे काम केले.
आम आदमी पार्टी या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सिद्ध झाली आहे.           स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झाली असली तरी देशातील बहुसंख्य नागरिक उघडय़ावर पालात राहत आहेत. त्यांना अद्यापही पक्की घरे नाहीत, ही देशासाठी लाजीरवाणी बाब आहे. जमीन, वीज, पाणी या महत्त्वपूर्ण प्रश्नावर एकही पक्ष चकार शब्द काढण्यास तयार नाही. राज्यात दादागिरी करणारे हे लोक मात्र दिल्लीत ताटाखालचे मांजर होतात, असा टोलाही राऊत  यांनी हाणला.
आम आदमी आता दुसरी स्वातंत्र्यानंतरची लढाई लढत असल्याचेही ते म्हणाले  यावेळी सीताराम ठाकूर, कैलास सपकाळ, अशोक भोसले, अब्दुल कादरी, सुरेश सोनुने, लक्ष्मण ठाकरे, डॉ. प्राची तनपुरे, उषा राऊत, अविनाश धांडे, शिवदास राऊत, योगेश भराड, सुनील सोळंकी उपस्थित होते.