केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पुणे मेट्रो प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून या कंपनी स्थापनेसाठी कंपनी सेक्रेटरीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी देण्यात आली. मात्र, ही नेमणूक कोणतीही निविदा न मागवता करण्यात आली आहे.
मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने गेल्या महिन्यात पुणे आणि दिल्लीत मिळून तीन बैठका झाल्या. केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या बैठकांमधील सूचनांनुसार मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल – एसपीव्ही) स्थापन केली जाणार आहे. या कंपनीमार्फत मेट्रो प्रकल्प राबवला जाईल. ही कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्यामुळे तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. तो बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आला.
मुंबईतील डी. ए. कामत अ‍ॅन्ड कंपनी यांची कंपनी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्याचा हा प्रस्ताव होता. एमएमआरडीएसाठी देखील कामत यांनीच कंपनी सेक्रेटरी म्हणून काम केले होते. पुण्यातील एसपीव्हीसाठी त्यांनीच काम करावे याबाबत चर्चा करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला. या कामासाठी कंपनीला वीस हजार रुपये अधिक
सेवा कराची रक्कम दिली जाईल. रीतसर जाहिरात देऊन निविदा मागवली व पूर्वानुभव नसलेल्या कंपनीला काम देण्याची वेळ आल्यास
कालपव्यय होईल आणि मेट्रोची कार्यवाही लांबेल.
त्यामुळे या प्रकल्पाची तातडी लक्षात घेऊन निविदा न मागवता, जाहिरात न देता व पूर्वानुभव असलेल्या कंपनीची नेमणूक करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. वारजे ते खराडी आणि पिंपरी ते स्वारगेट
या दोन्ही मार्गिकांसाठी एसपीव्ही स्थापन करण्याचे काम ही कंपनी
करून देईल.

Story img Loader