मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाची सुमारे ११० वर्षांपासूनची मागणी आता वास्तवात येण्याची शक्यता असताना राजकीय नेत्यांमध्ये नेहमीप्रमाणे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. विशेषत्वाने लोकसंग्राम पक्षाचे आ. अनिल गोटे आणि भाजपचे खा. प्रतापदादा सोनवणे हे याबाबतीत पुढे आहेत.
बुधवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेप्रसंगी रेल्वेमंत्र्यांनी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यास मंजुरी दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात सर्वानीच या निर्णयाचे स्वागत केले. त्यातच राजकीय नेत्यांमध्ये आपण किती व कसे प्रयत्न केले हे जाहीर करण्यासाठी धडपड सुरू झाली. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या मागणीचा इतिहास आणि वेळोवेळी घेण्यात आलेले निर्णय यांचा आ. गोटे यांनी पत्रकाद्वारे ऊहापोह केला आहे. मनमाड-इंदूपर्यंतच्या ३६५ किलोमीटर परिसरातील तब्बल १० लाख लोकांनी एकत्र येऊन १२ डिसेंबर २००७ रोजी ठिकठिकाणी बैठा सत्याग्रह करत रेल्वे मार्गाची मागणी मांडली होती. त्यामुळे या मागणीचा सरकारला विचार करावा लागल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.
हा रेल्वे मार्ग सात टक्के फायद्याचा असल्याबद्दल २१ मार्च २००४ रोजी सर्वेक्षण अहवाल रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आला होता. या काळातच मुद्रांक घोटाळ्यातील संशयित म्हणून गोटे यांना तुरुंगात जावे लागले. आपण तुरुंगात असेपर्यंत म्हणजे चार वर्षे रेल्वे मार्गाचा सर्वेक्षण अहवाल अक्षरश: धूळ खात पडून होता. ५ जुलै २००७ रोजी आपण तुरुंगातून बाहेर आलो. पहिल्याच सभेत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची जबाबदारी मांडली होती, असे गोटे यांनी म्हटले आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हावासीयांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या बनलेल्या रेल्वे मार्गामुळे औद्योगिक विकासासह रोजंदारीचाही प्रश्न सुटू शकेल, असे मत व्यक्त केले. खा. प्रतापदादा सोनवणे यांनीही आपण कसे प्रयत्न केले, हे वेगवेगळ्या कागदपत्रांद्वारे मांडले आहे. खा. समीर भुजबळ यांचाही या रेल्वे मार्गासाठी मोठा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा