महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर आणि उमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील जयश्री अहिरराव, स्थायी समितीच्या विद्यमान सभापती कल्पना महाले तसेच स्थायी समितीचे माजी सभापती सतीष महाले यांची पत्नी मनिषा महाले यांची नांवे आघाडीवर आहेत. गतवेळी महापौरपद निवडणुकीवेळी भाजपने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला असल्याने यंदा अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचे स्पष्ट आहे.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ३४ जागा पटकावत राष्ट्रवादीने सत्ता काबीज करण्यात यश मिळविले. निवडणुकीची रणधुमाळी संपुष्टात आल्यावर महत्वाची पदे कोणाच्या पदरात पडतात याबद्दल शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे. महापालिका प्रशासनाने त्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. मावळत्या महापौर मंजुळा गावित यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला पूर्ण होत असल्याने यापूर्वी नव्या महापौरांची निवड करणे आवश्यक आहे. गतवेळी महापालिकेचे केवळ तीन सदस्य असताना भाजपने मंजुळा गावित यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धडा मिळाला होता. यासोबत महापालिकेत संख्याबळात पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीला उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या सभापतीपदावर समाधान मानावे लागले. सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी अखेरच्या टप्प्यात शिवसेनेचे संजय गुजराथी होते.
म्हणजे महापौर भाजपचा, उपमहापौर राष्ट्रवादीचा तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे अशी स्थिती होती. केवळ महापौरपदाचा उमेदवार सांभाळता न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार फुलाबाई भिल या गायब झाल्या होत्या. याचवेळी ही संधी उपलब्ध झालेल्या शिवसेनेलाही त्यांच्याकडे असलेला चुडामण मोरे हा उमेदवार सांभाळता आला नाही.
हे दोन्हीही उमेदवार उपलब्ध नसल्याची संधी साधून महापालिकेत फारसा प्रभाव नसलेल्या भाजपकडे संधी चालून आली आणि त्यांनी त्याचे सोने केले. हा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रवादीकडून अधिक सावधगिरी बाळगली जाईल. आता महापौर निवडीबाबत निर्णय अपेक्षित असून लवकरच विभागीय आयुक्त अथवा त्यांनी नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.
२६९ उमेदवारांची अनामत जप्त
महापालिकेच्या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उडी मारणाऱ्या निम्म्याहून अधिक उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नसल्याचे उघड झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, त्यात लोकसंग्राम पक्षाच्या ३६ तर काँग्रेसच्या ३४ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणातील २६९ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. ही रक्कम जवळपास पावणे दहा लाखाच्या घरात आहे.
महापालिकेच्या ३५ प्रभागातील ७० जागांसाठी १५ डिसेंबर निवडणूक झाली. त्यात तब्बल ४६६ उमेदवार रिंगणात होते. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव होत्या. निवडणुकीत उमेदवारांना त्यांच्या प्रभागातून किमान एक अष्टमांश मते मिळणे आवश्यक असते. तथापि, केवळ एक अष्टमांश मतेही न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. या नियमानुसार २६९ उमेदवारांना ही रक्कम गमवावी लागली आहे. निवडणूक लढविण्यासाठी महिला उमेदवार आणि आरक्षित प्रवर्गासाठी अडीच हजार तर अन्य सर्व उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती. ज्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, त्यात १३० अपक्षांचा समावेश आहे. अपक्षांनंतर अनामत गमावलेल्यांमध्ये लोकसंग्राम पक्षाच्या सर्वाधिक ३६ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या ३४ तर निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकावत सत्ता काबीज करणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. ही रक्कम गमावणाऱ्यांमध्ये १३९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांची नऊ लाख ६५ हजार रुपयांची अनामत रक्कम महापालिका तिजोरीत जमा झाली.
अनामत रक्कम जप्त झालेले पक्षनिहाय उमेदवार
अपक्ष १३०, लोकसंग्राम ३६, काँग्रेस ३४, मनसे ३३, समाजवादी पक्ष १०, शिवसेना ७, भाजप ३, बसप ४, भारिप ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, आंबेडकरवादी जनमोर्चा २, इंडियन युनियन मुस्लिम लीग २, लोकभारती १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा