चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय देवतळे, विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे या तीन विद्यमान आमदारांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्तकेली आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभेत काँग्रेसकडून या लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक दावेदारांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी त्या पद्धतीने कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. भाजपकडून विद्यमान खासदार हंसराज अहीर यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे. मात्र काँग्रेसकडून इच्छुक दावेदारांची यादी वाढत आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या या यादीत पालकमंत्री संजय देवतळे व माजी खासदार नरेश पुगलिया यांची नावे होती. देवतळे किंवा पुगलिया या दोनपैकी एकाला उमेदवारी मिळेल त्या दृष्टीने राजकीय चर्चा रंगायला सुरुवात झालेली आहे, परंतु आता काँग्रेसचे चिमूरचे आमदार व माजी मंत्री विजय वडेट्टीवार व राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनीही पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा लढण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसमध्ये इच्छुकांमध्ये चुरस रंगलेली आहे.
पालकमंत्री संजय देवतळे यांचे नाव स्वत: मुख्यमंत्र्यांनीच समोर केले आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी सध्या तरी देवतळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, परंतु निष्क्रिय पालकमंत्री हा ठपका देवतळे यांच्यावर बसला असल्याने ऐनवेळी त्यांचे काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा लढण्याची इच्छा बोलून दाखविली. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी वडेट्टीवार यांचे सख्य सर्वश्रुत आहे, तसेच त्यांची आक्रमक शैली पक्षाला चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात फायद्याची ठरेल, असाही एक मतप्रवाह आहे. सर्वाशी जुळवून घेण्याचे कसबही त्यांच्यात आहे. त्यामुळे वडेट्टीवार योग्य राहतील, अशीही चर्चा आहे. त्यांचा किल्ला दिल्लीत स्वत: राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश लढवीत आहेत, तर राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनीही लोकसभेची उमेदवारी मिळाली तर लढण्याची पूर्ण तयारी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या मतदारसंघावर कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. जवळपास आठ ते नऊ लाख कुणबी मतदार या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून आजवर अल्पसंख्याक समाजाचा खासदार निवडून गेला असला तरी कुणबी समाजाला आपलेसे करण्यासाठी काँग्रेस धोटे यांनाही उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोटे यांनी त्यांचे दिल्लीतील ‘गॉडफादर’च्या माध्यमातून सूत्रे हलविण्यास सुरुवात केलेली आहे.
धोटे यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर तिकडे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पुत्र व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया यांना राजुरात विधानसभेतून रिंगणात उतरविण्याचाही विचार आहे. त्यामुळे माजी खासदार पुगलिया लोकसभेत धोटे यांना मदत करतील व विद्यमान आमदारांची नाराजीही राहणार नाही. सध्या तरी काँग्रेसच्या या तिन्ही आमदारांनी लोकसभा लढण्याची इच्छा स्वत:हून व्यक्त केली असल्याने तिकडे माजी खासदार नरेश पुगलिया यांची मोठी अडचण झाली आहे. कारण आजवर दिल्लीत माजी खासदार नरेश पुगलिया यांचे जबरदस्त वजन होते, मात्र आता मुख्यमंत्र्यांमुळे देवतळे व मोहन प्रकाश यांच्या आशीर्वादाने वडेट्टीवार यांचे नाव पोहोचले आहे. त्यामुळे उमेदवारीवर दावेदारी सांगताना पुगलिया यांना बराच किल्ला लढवावा लागणार आहे. या जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय नेत्यांना पुगलिया यांची दिल्लीतील शक्ती ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी कितीही प्रयत्न केला तरी ऐनवेळी पुगलिया यांचेच नाव समोर येईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. सध्या जिल्हा काँग्रेस समितीवर पुगलिया यांचे वर्चस्व आहे. पक्ष संघटना व प्रदेश पातळीवरूनही त्यांचेच नाव समोर करण्यात येईल, असाही एक मतप्रवाह आहे. एकूणच काँग्रेसच्या तिन्ही आमदारांनी लोकसभेवर एकाच वेळी दावा सांगितल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आतापासूनच जोरदार संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा