दहावी-बारावी परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत परंतु, जेईई/एनईईटी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचे शहरात जोरदार प्रदर्शन सुरू असून विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रवेश मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. शहरातील प्रत्येक कानाकोपरा आयआयटी जेईई-एनईईटी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींनी व्यापला आहे. चांगल्या क्रमवारीने आयआयटी, मेडिकल प्रवेश पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांची छायाचित्रे तसेच आयआयटी फॅकल्टीजचे गुणगान गाणारा मजकूर जाहिरातीत वाचण्यास मिळत आहे. आपणच सर्वोत्तम कोचिंग देऊ शकतो, असा दावा अनेक कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी जाहिरातींमधून केला आहे. वृत्तपत्रांमधूनही जाहिराती प्रकाशित होऊ लागल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासेसची लाखो रुपये फी देण्याइतपत परिस्थिती नाही त्यांना अॅनलाईन कोचिंग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
नेटवरील सर्वेक्षणानुसार स्वत:चा ‘ब्रँड’ सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महागडय़ा कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतलेले आहेत. सर्वोत्तम पॅकेज देणाऱ्या आणि कोचिंग फॉरमॅट असलेल्या कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांचे पॅकेज १ लाख २० हजार ते १ लाख ८० हजारात देऊ करण्यात येत आहे. कोटाच्या फॅकल्टीज असलेल्या कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे अलीकडील पाहणीत आढळले आहे. अनेक कोचिंग क्लासेस त्यांच्याकडे कोटा प्रशिक्षित फॅकल्टीज असल्याचा दावा करून विद्यार्थ्यांना आकर्षिण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जेईई किंवा एनईईटी उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्यांना पर्याय निवडणे कठीण झाले आहे.
विदर्भात आयआयटीला प्रवेश मिळविण्यास इच्छुक असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयआयटी होम हा सवरेत्कृष्ट पर्याय समजला जातो. याच्या स्पर्धेत आता अनेक कोचिंग क्लासेस उतरले आहेत. आयआयटी होमने स्वत:ची पत आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्याच निवडीला नेहमी प्राधान्य दिल्याने याबद्दल लोकांची ओरड असते. परंतु, गुणवत्तेशी तडजोड करणे आयआयटी होमच्या नियमात बसत नसल्याने विद्यार्थ्यांना तावून सुलाखूनच प्रवेश दिला जात आहे. आयआयटी होमच्या व्यवस्थापकीय संचालक नीशा कोठारी यांच्या मते कोचिंग इन्स्टिटय़ूट्सच्या जाहिरातबाजीमुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. आयआयटी होमचा भर नेहमीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर राहिला आहे. आयआयटी होमला प्रवेश मिळविणे अत्यंत कठीण असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना पर्याय नसतो परिणामी त्यांना अन्य कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. आयआयटी होमच्या कसोटीवर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भविष्यातील स्पर्धेत टिकू शकतात. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही.
रिझोनन्स नागपूरचे केंद्र प्रमुख अभिषेक बन्सल म्हणतात, हा काही मद्य किंवा लॉटरी विकण्याचा धंदा नाही. अलीकडच्या काळात कोचिंग क्लासेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यासाठी आकारली जाणारी फी देखील लाखांच्या घरात आहे, यात शंका नाही. परंतु, याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. सरकारी शिक्षणात दर्जेदार आणि गुणवत्ता असलेले शिक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने कोचिंग क्लासेस हाच विद्यार्थ्यांपुढील एकमेव पर्याय आहे. अनेक शाळा-महाविद्यालयात प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसची निवड अपरिहार्य आहे. याचा फायदा उचलणाऱ्या काही खाजगी कोचिंग संस्था विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात हेदेखील कटुसत्य आहे.
जेईई-एनईईटी कोचिंग क्लासेसमधील जीवघेण्या स्पर्धेने पालकांमध्ये संभ्रम
दहावी-बारावी परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत परंतु, जेईई/एनईईटी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचे शहरात जोरदार प्रदर्शन सुरू असून विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रवेश मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. शहरातील प्रत्येक कानाकोपरा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-05-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition in jee neet coaching classes confusion between parents