बाजू मांडण्यासाठी श्वेतपत्रिकांची चढाओढ
सिंचन घोटाळ्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वेगवेगळ्या रंगाच्या नावाने श्वेतपत्रिका काढल्या जात असून त्यात आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने श्वेतपत्रिका जारी करत विविध प्रकल्पाबाबत बाजू मांडली. अजित पवार यांना त्यात ‘क्लीन चीट’ दिल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. त्यानंतर विरोधकांनी पवार यांना लक्ष्य करीत सरकारने काढलेली श्वेतपत्रिका ही जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘काळी पत्रिका’ जाहीर करून त्यात काय सत्य आणि काय नाही हे सांगण्यात आले. त्या काळ्या पत्रिकेवर सत्ताधाऱ्यांनी टीका करून प्रसार माध्यमांकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील ज्येष्ठ नेते मधुकरराव किंमतकर यांनी बुधवारी पिवळी पत्रिका जाहीर करून विदर्भाच्या सिंचनाबाबतची वस्तुस्थिती मांडली.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्यासाठी जारी केलेल्या काळ्या पत्रिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निळ्या रंगातील सत्यपत्रिकेचे प्रकाशन केले. या आकर्षक अशा सत्यप्रत्रिकेचे प्रकाशन होण्याच्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्यावर घाव, जनतेला लुटण्याचा डाव- राष्ट्रवादीची असत्य पत्रिका’ अशी पांढरी श्वेतपत्रिका प्रकाशित करून राष्ट्रवादीची सत्यपत्रिका किती खोटी आणि फसवी आहे याची माहिती प्रसार माध्यामांना दिली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले असताना येणाऱ्या पाच-सहा दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांकडून सिंचनावर बाजू मांडण्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या रंगात श्वेतत्रिका प्रकाशित होतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांध्ये वेगवेगळ्या रंगात रंगलेले ‘श्वेतपत्रिकेचे पेपर वॉर’ आणखी भडकण्याची शक्यता
आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा