पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन आणि उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादन यांच्यातील सुपरिचित जुगलबंदीने औरंगाबादकर कानसेनांची तबियत खूश करून टाकली. निमित्त होते प्रोझोन मॉलवर थंडीच्या साक्षीने आयोजित केलेल्या संगीत मैफलीचे.
प्रोझोन प्रस्तुत इंडय़ुरन्स, तसेच पुणे येथील व्हायोलिन अकादमीच्या वतीने प्रोझोन मॉलच्या लॉनवर ‘लिजन्डस् इन कॉन्सर्ट’ अलीकडेच या मैफलीचे आयोजन केले होते. तबला व संतूर या भारतीय वाद्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती व सन्मान मिळवून देणाऱ्या या दोन दिग्गज कलाकारांची या वाद्यांवरील हुकुमत लाजवाब तर आहेच, तसेच प्रत्येक मैफलीत त्यांच्या जुगलबंदीने उपस्थितांना नव्या अनुभूतीचा आनंद मिळतो. पं. शर्मा यांच्या संतूरवादनाने या मैफलीचा प्रारंभ झाला. सुमधूर संतूरवादनाने राग मारू बिहाग त्यांनी लीलया सादर केला. त्याला साथ देताना तबल्यावर उस्ताद झाकिर हुसेन यांची सुपरिचित थाप पडताच टाळ्यांचा मोठा गजर झाला. तबलावादन आणि संतूरवादनाच्या परिचित जुगलबंदीची कानसेनांनी या वेळी नव्या अनुभूतीसह पर्वणी साधली. राग मारू बिहागमध्ये झपताल, एकतालात या दोघांनी बंदिशीचे सादरीकरण केले. उत्तरार्धातही जुगलबंदीचा बहर कायम ठेवताना पं. शर्मा व उस्ताद झाकिर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. उस्ताद झाकिर यांनी या वेळी मायमराठीतून संवाद साधून उपस्थितांना सुखद धक्का दिला. वेरूळ महोत्सवास २० वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. पं. शर्मा यांनीही मनोगत व्यक्त करताना संगीत कलेला लोकाश्रय व राजाश्रय मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले.
इंडय़ुरन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन, प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे, पोलीस आयुक्त संजयकुमार, पंडित अतुल उपाध्ये आदींची उपस्थिती होती.