तालुका सल्ला समिती नियमबाह्य़ असल्याची तक्रार
प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) व्यवस्था असताना राजकीय कार्यकर्त्यांची ‘सोय’ करण्यासाठी ‘आत्मा’ची समिती खुली करून देण्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून मोर्शी येथील नवीन शेतकरी सल्ला समितीही नियमबाह्य़रीत्या गठित करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये समन्वय साधण्याचे काम ‘आत्मा’कडे सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने १९९८पासून जागतिक बँकेच्या साहाय्याने सुरुवातीला राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर २००५मध्ये प्रत्येक जिल्ह्य़ात हा प्रकल्प राबवण्यासाठी ‘आत्मा’ ही यंत्रणा उभी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य पातळीवरील समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय समिती, त्यानंतर जिल्हास्तरीय नियामक मंडळ, कार्यकारी समिती, तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती, अशी या यंत्रणेतील उतरंड आहे. कृषी विस्तार आणि संशोधनाच्या संदर्भात समन्वयाचे प्रभावी माध्यम म्हणून तालुका सल्ला समिती कार्यरत राहील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तालुका पातळीवर या समितीने फार महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. या तालुका सल्ला समितीत कृषी क्षेत्रातील जाणकार शेतकऱ्यांना सदस्य म्हणून सामील करून घेणे अभिप्रेत आहे. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे, पण एखाद्या समितीचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असताना ही समिती कोणत्याही सबळ कारणाशिवाय बरखास्त करण्यात आल्याचा प्रकार दर्यापूर तालुका शेतकरी सल्ला समितीच्या बाबतीत घडला होता. शिवाय, या समितीत राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित लोकांना सन्मानाने सामील करून घेण्यात आले आणि नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याची तक्रार दर्यापूर येथील शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कृषी सहसंचालकांनीही अहवाल सादर करून हा प्रकार नियमबाह्य़ असल्याचे सूचित केले होते.
असाच प्रकार मोर्शी तालुका सल्ला समितीच्या बाबतीत घडला असून या समितीचे सदस्य नियुक्त करताना कोणतीही पारदर्शकता ठेवण्यात आली नाही. योग्य अर्जदारांना डावलण्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग करण्यात आला, अशी तक्रार मोर्शी तालुक्यातील लेहगाव येथील शेतीतज्ज्ञ अरविंद तट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. स्वमर्जीतल्या लोकांचा, आप्तेष्टांचा या समितीत समावेश करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी स्वत:च अर्ज भरून त्यावर समितीच्या सदस्यांच्या सह्य़ा घेतल्या आणि वरिष्ठांची दिशाभूल करून बोगस गुणवत्ता यादी तयार केली. या यादीला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन नव्या समितीचे गठन करण्यात आले, असे अरविंद तट्टे यांचे म्हणणे आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून योग्य अर्जदारांवर अन्याय केला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी अरविंद तट्टे यांनी केली आहे. राजकीय कार्यकर्त्यांची सोय करून देण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून त्यांची वर्णी लावून देण्याचे प्रकार नवीन नसले, तरी चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना खडय़ासारखे बाजूला सारून ‘आत्मा’च्या सल्ला समितीत राजकीय कार्यकर्त्यांनी घुसखोरी करण्याच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
मोर्शीच्याही ‘आत्मा’ सल्ला समितीतही घुसखोरी
प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) व्यवस्था असताना राजकीय कार्यकर्त्यांची ‘सोय’ करण्यासाठी ‘आत्मा’ची समिती खुली
First published on: 05-12-2013 at 08:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complain that the distrect committee illegal