इंटरनेट बंद पडल्यावर कर्मचारी वर्ग दुरुस्तीकडे पाठ फिरवतो, भ्रमणध्वनीवर बोलत असताना मध्येच तो बंद पडतो, आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही, वारंवार प्रयत्न केल्यावर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधता येतो.. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती बुधवारी भारत संचार निगम लिमीटेडतर्फे आयोजित बीएसएनएल मेळाव्यात झाली. निगमच्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयातून पुरेशा प्रमाणात साहित्याची उपलब्धता होत नसल्याने दुरुस्तीच्या कामात अवरोध येत असल्याचे महाप्रबंधक सुरेश प्रजापती यांनी सांगितले. शहरात ५० नवीन मनोऱ्यांना मान्यता मिळाली असून पुढील काळात भ्रमणध्वनीची सेवा दर्जेदार होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नाशिक येथील भारतीय संचार निगम लिमिटेडच्यावतीने बुधवारी कॅनडा कॉर्नर येथील संचार परिसरात हा मेळावा पार पडला. यावेळी बीएसएनएलद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच ‘एफटीटीएच’ सेवेच्या ‘हाय स्पीड ब्रॉड बँड’ सेवेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच यावेळी बीएसएनएलची सीम कार्डस मोफत वितरित करण्यात आली. कार्यशाळेत बीएसएनएलच्या सेवेतील तक्रारी महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या.
बीएसएएलच्या सेवेमुळे त्रस्तावलेल्या नागरिकांनी यावेळी वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी मांडल्या. संध्या कानडे यांनी बऱ्याच दिवसांपासून बंद असणाऱ्या इंटरनेट जोडणीची योग्य पध्दतीने दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार केली. बीएसएनएलचे कर्मचारी वारंवार तपासणी करतात. पण त्यांना दोष लक्षात येत नाही. मग, दुरुस्तीऐवजी खर्चिक सल्ले दिले जातात. जोडणीच्या वाहिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी गुंतागुंत करून ठेवली आहे. या सर्व प्रकारामुळे आपण बीएसएनएलची इंटरनेट जोडणी बंद करण्याच्या मनस्थितीत आलो असल्याचे रानडे यांनी नमूद केले. यावर प्रजापती यांनी तक्रारीचे निराकरण करण्याचे मान्य केले.
बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवेबद्दल अधिक्याने तक्रारी होत्या. भ्रमणध्वनीवर संपर्क करताना ग्राहकाच्या नाकीनऊ येते. कोणताही क्रमांक तात्काळ लागत नाही. जेव्हा कधी संपर्क साधला जातो, तेव्हा अचानक तो मध्येच बंद होऊन जातो. संभाषण सुरू असताना आवाजही नीट ऐकू येत नाही. सेवेतील या त्रुटी का दूर केल्या जात नाहीत, असा प्रश्न काही ग्राहकांनी उपस्थित केला.
भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवेत काही दोष असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी मान्य केले. दुरुस्तीसाठी नाशिक विभागाला पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध होत नसल्याने ही स्थिती उद्भवत आहे. शहर परिसरात ५० नवीन मनोऱ्यांना मान्यता मिळाली असून ते काम झाल्यास भ्रमणध्वनी सेवा दर्जेदार होईल, असा विश्वास प्रजापती यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत ग्राहकांना ‘फायबर टू होम’ अर्थात एफटीटीएच’ या अतिजलद इंटरनेटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या माध्यमातून ग्राहकांना अतिजलद इंटरनेट सेवेचा आनंद घेता येईल. सध्या नाशिकमध्ये ही सेवा वापरणारे २०० ग्राहक असून त्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader