बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणाच्या ठाण्यातील ‘ग्रेट जॉब अ‍ॅचिवर्स’ कंपनीविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सनेतर्फे  येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अजय गुप्ता याची ठाण्यातील दादा पाटील वाडी येथील श्रीकृष्णा कॉम्प्लेक्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे काम करणारी ‘ग्रेट जॉब अ‍ॅचिवर्स’ ही कंपनी आहे. सुशिक्षित तसेच बेरोजगार तरुणांकडून ही व्यक्ती नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५०० ते १०० रुपये घेत असे. तसेच नोकरी न मिळाल्यास पैसे परत करण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात येत होते. प्रत्यक्षात नोकरी आणि जमा केलेले पैसे या दोन्ही गोष्टी तरुणांना उपलब्ध होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. नोकरी न मिळालेल्या तरुणांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांना धमकी तसेच शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१२ ते जानेवारी २०१३ या काळात हजारो तरुणांकडून या कंपनीने पैसे घेऊन अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा आरोपही मनसेने केला आहे. तसेच या कंपनीकडे व्यवसाय करण्याच्या परवान्यासह अन्य काही परवाने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या कंपनीने या कालावधीत किती तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत याची चौकशी करण्याची मागणीही मनसेने केली आहे. संबधित तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Story img Loader