एका आमदाराने महागडी कार हडपल्याची तक्रार नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबईला पाठविण्यात आले आहे. चिमूरच्या युवाशक्ती संघटनेचे संस्थापक कीर्तीकुमार उपाख्य बंटी भांगडिया हे या प्रकरणात फिर्यादी असून त्यांनी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे.
बंटी भांगडिया हे मिटकॉन इन्फ्रा प्रोजेक्टचे संचालक आहेत. त्यांची व विजय वडेट्टीवार यांची आधी मैत्री होती. २०१० मध्ये वडेट्टीवार मंत्री झाले. त्याचवेळी ३१ जुलै २०१० रोजी बंटी भांगडिया यांनी पूर्व मुंबईतील कलिना सांताक्रुजमधील शमन व्हिल्स प्रा. लि.कडून मर्सिडीझ बेंझ कार (एमएच/३४/एए/६३९३) खरेदी केली. सी४एमएटीआयसी जीएल ३५० सीडी आयलॅक्स या मॉडेलची ही कार आहे. ७१ लाख ७६ हजार ३५२ रुपयात कर्जावर ती खरेदी करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांनी ती कार काही दिवसांसाठी मागितली. मैत्रीखातर बंडी भांगडिया यांनी ही कार वडेट्टीवार यांना ३ ऑगस्ट २०१० रोजी दिली. ती कार त्यांनी वारंवार परत मागूनही अद्यापही परत दिलेली नाही, अशी तक्रार बंटी भांगडिया यांनी धंतोली पोलीस ठाण्यात केली. मूळ व्यवहार मुंबईत झाल्याने तपासासाठी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे. या कारच्या कर्जाचा हप्ता मिटकॉन कंपनी भरीत आहे. कोटक मिहद्र प्राईमकडून ५७ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. कार परत द्यावी, यासाठी २२ सप्टेंबर २०१० रोजी व त्यानंतर अनेकदा वडेट्टीवार यांना पत्रे पाठविण्यात आली. कारच्या विम्याचे नूतनीकरणही अद्याप करता आलेले नाही, असे या तक्रारीत म्हटले आहे.
आमदार वडेट्टीवारांविरुद्ध कार हडपल्याची तक्रार
एका आमदाराने महागडी कार हडपल्याची तक्रार नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबईला पाठविण्यात आले आहे. चिमूरच्या युवाशक्ती संघटनेचे संस्थापक कीर्तीकुमार उपाख्य बंटी भांगडिया हे या प्रकरणात फिर्यादी असून त्यांनी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे.
First published on: 08-02-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint against mla vadettivar for robbering the car