ग्राहकाचा बिघडलेला मोबाइल दुरुस्त करण्यात दिरंगाई करणाऱ्या सेवा केंद्रासह सॅमसंग या बहुराष्ट्रीय मोबाइल कंपनीला मध्य मुंबई ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. ग्राहकाला मोबाइलची मूळ किंमत १५,०२९ रुपये ९ टक्के व्याजाने परत करावी, याचबरोबर मानसिक त्रास झाल्याबद्दल पाच हजार रुपये आणि न्यायिक लढय़ाचे तीन हजार रुपये देण्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.
माहीम येथे राहणाऱ्या सीमा खोत यांनी सॅमसंगचा गॅलेक्सी ग्रँड नीओ जीटी १९०६० हा फोन सॅमसंगच्या ई-स्टोअरमधून जुलै २०१४ मध्ये खरेदी केला. हा फोन वापरून एक महिना होत नाही तोच त्यामध्ये ‘इमरजन्सी कॉल्स ओन्ली’ असा संदेश दिसू लागला. यामुळे फोन करणे व येणे यावर बंधन आले. या संदर्भात त्यांनी सर्वप्रथम मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सिम कार्ड बदलले. तरीही ही अडचण कायम सुरू राहिली. यानंतर पुन्हा मोबाइन नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार फोन सेफमोडमध्ये सुरू करून पाहिला. त्यातही ती अडचण कायम राहिली. यामुळे खोत यांनी सॅमसंग कंपनीचे ग्राहक तक्रार निवारण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेल पाठविला. या ई-मेलची पोच मिळाली यानंतर पुढे काहीच झाले नाही. म्हणून त्यांनी काही दिवसांनी पुन्हा ई-मेल पाठविला. त्यानंतर एका ग्राहक सेवा अधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला आणि दादर ईस्ट येथील कंपनीच्या एका अधिकृत सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. या सेवा केंद्रात खोत यांना त्यांचा फोन ठेवून घ्यावा लागेल असे सांगण्यात आले. फोन दुरुस्त झाल्यावर सेवा केंद्रातून कळविले जाईल याची वाट पाहात असलेल्या खोत यांनी काही दिवसांनी स्वत:हून सेवा केंद्रात जाऊन फोनची चौकशी केली. त्यावेळेस त्यांना फोन दुरुस्त झाला असून तो देण्यात आला. मात्र फोनची अवस्था पूर्वीपेक्षा खराब झाल्याचे खोत यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी आक्षेप नोंदविताच तेथे उपस्थित ग्राहक सेवा अधिकाऱ्याने दुरुस्ती करताना असे होतेच असे सांगून त्यांची बोळवण केली. मात्र खोत यांनी आक्षेपांसह हा फोन स्वीकारत असल्याची नोंद फोन स्वीकारताना केली. यानंतर पुन्हा जुनीच अडचण सुरू झाली. पुन्हा खोत यांनी कंपनीशी संपर्क साधला. पुन्हा त्यांना सेवा केंद्रात पाठविण्यात आले. तरीही समस्या सुटत नव्हती म्हणून खोत यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचानेही कंपनीला ई-मेल पाठविला. पहिल्या ई-मेलला तेथून काहीच उत्तर आले नाही. मग पुन्हा दुसरा ई-मेल पाठविण्यात आला. त्यावर खोत यांचे सर्व दावे खोटे असल्याचा ई-मेल कंपनीने केला. अखेर खोत यांनी ग्राहक न्यायालयाकडे धाव घेतली. तेथे त्यांना सेवा केंद्र व कंपनी दोघांविरोधात तक्रार केली. यानुसार न्यायालयाने दोघांनाही वारंवार नोटिसा पाठविल्या. मात्र त्याला उत्तर देण्याची तसदीही कुणी घेतली नसल्याचे खोत यांनी नमूद केले आहे. यावर खोत यांनी मोबाइलची मूळ रक्कम तसेच नुकसानभरपाई म्हणून ५०,००० रुपये आणि न्यायिक लढय़ाच्या खर्चाचे ५००० रुपये मिळावे असे न्यायालयाला सांगितले. यावर निर्णय देताना न्यायालयाने मोबाइलची मूळ किंमत १५०२९ रुपये ९ टक्के व्याजाने परत करावी, याचबरोबर पाच हजार रुपये मानसिक त्रास झाल्याबद्दल आणि तीन हजार रुपये न्यायिक लढय़ाचे देण्याचे आदेश दिले. ही रक्कम एका महिन्याच्या आत ग्राहकाला मिळावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ग्राहक न्यायालयाचा सॅमसंगला दणका
ग्राहकाचा बिघडलेला मोबाइल दुरुस्त करण्यात दिरंगाई करणाऱ्या सेवा केंद्रासह सॅमसंग या बहुराष्ट्रीय मोबाइल कंपनीला मध्य मुंबई ग्राहक न्यायालयाने दणका
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-06-2015 at 07:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint against samsung mobile in consumer court