कौटुंबिक िहसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मागील सहा महिन्यांत जिल्हय़ातील १८१ सुनांनी सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद देऊन हिसका दाखवला. दरदिवशी एक तरी सून सासरच्या लोकांचे गाऱ्हाणे घेऊन पोलीस ठाण्याची पायरी चढत असल्याचे चित्र आहे. यात नोंदवलेली छळाची कारणे बहुतांशी सारखीच आहेत. त्यामुळे काही प्रकरणे सोडली तर कायद्याचा वापर कशा पद्धतीने होत आहे, याची उघड चर्चा होते.
मागील सहा महिन्यांत कौटुंबिक िहसाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत जिल्हय़ात तब्बल १८१ सुनांनी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्या. त्यानुसार गुन्हे दाखल झाले. सहा महिन्यांत प्रत्येक दिवशी एक सून सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार घेऊन पोलीस ठाण्याची पायरी चढली असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या या तक्रारींमध्ये सासरकडून होणाऱ्या छळांची कारणेही सारखीच आहेत. यात प्रामुख्याने, दुचाकीसाठी छळ, तू पसंत नाहीस, तू काळी आहेस, मूल होत नाही, स्वयंपाक येत नाही, घर बांधकाम व जमीन खरेदीसाठी माहेराहून पसे घेऊन ये या कारणांसाठी, छळ होत असल्याचे गाऱ्हाणे आहे.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरातील छोटी-मोठी कुरबूर, तंटे घरातच मिटवले जात. घरात न मिटणारे तंटे गावातील प्रतिष्ठांसमोर मिटवले जात. मात्र, आता सर्वानाच कायद्याचे पुरेसे ज्ञान झाल्यामुळे कुटुंबातील छोटय़ा-मोठय़ा तक्रारींमधूनही थेट पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करण्याची पद्धत रुळली आहे. कारण कोणतेही असले, तरी कौटुंबिक िहसाचार कायद्यांतर्गत सासरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतो, हे अनेकदा समोर आले आहे. या बाबत न्यायालयाकडूनही खंत व्यक्त केली गेली. मात्र, कौटुंबिक कायदा लागू झाल्यानंतर गुन्हय़ांचे प्रमाण कमी होण्याऐवजी ठाण्यात नोंद होणाऱ्या गुन्हय़ांची संख्या कमालीची वाढत असल्याचे दिसत आहे.
मागील सहा महिन्यांत दाखल गुन्ह्य़ांमध्ये जानेवारीत ३५, फेब्रुवारी २५, मार्च २४, एप्रिल ४०, मे २०, जून ३७ अशा एकूण १८१ केसेसचा समावेश आहे. छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सासरच्या लोकांना कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागते. परिणामी सुनेसाठीही बहुतांशी वेळा समेटाचा आणि परतीचा मार्ग बंद होतो, हे गुन्हे दाखल झालेल्या अनेक घटनांवरून समोर आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा