शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना देण्यासाठी असलेल्या जीवनावश्यक वस्तू त्यांना न देता त्या परस्पर लाटल्या जात असल्याचा आरोप येथील लोकसंघर्ष समितीचे संस्थापक अतिक कमाल व अध्यक्ष सलीम अहमद यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तक्रार करूनही त्याकडे डोळेझाक होत असल्याने पुरवठा खात्याच्या आशीर्वादानेच हा गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त करून या संदर्भात दोषी व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी २७ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या दोघांनी दिला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये डिसेंबर २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीसाठी शहरातील अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी गहू व तांदळाचा जादा कोटा देण्यात आला होता. तसेच मे महिन्यासाठी अंत्योदय व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी साखरेचा माणशी ५०० ग्रॅम जादा कोटा देण्यात आला होता. मात्र शहरातील गरीब शिधापत्रिकाधारकांना हा जादा कोटा वाटलाच गेला नसल्याचा आरोप कमाल व अहमद यांनी केला आहे. अशाप्रकारे गरिबांसाठी आलेला चार हजार क्विंटल गहू, साडेतीन हजार क्विंटल तांदूळ व हजार क्विंटल साखर परस्पर लाटण्यात आल्याचा आरोप करत या वस्तू कोणाच्या पश्चात गेल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
घासलेटच्या बाबतीतदेखील अशाच प्रकारे जनतेची अडवणूक होत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.
प्रत्येक युनिटमागे ८०० मिली हे प्रमाण असताना शहरात अनेक ठिकाणी केवळ ५०० मिली या प्रमाणात घासलेटचे वितरण केले जाते. या मनमानीमुळे गरीब जनतेवर काळ्या बाजारात महागडे घासलेट घेण्याची वेळ येत असल्याचे नमूद करून आगामी रमजान हा सण लक्षात घेता शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी, तसेच या व्यवस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी अतिक कमाल यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा