खासदार आम्हाला भेटत नाहीत, गेल्या कित्येक दिवसांत त्यांचे आमचे दर्शनही नाही येथपासून ते खासदार आपला विकास निधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतात, अशा अनेक तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर यांच्यासमक्ष वाचला. बहुसंख्य सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी खासदारांवर टीका केल्याने मिल्रेकर गांगरले. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. जोवर शिवसेनेच्या मुखपत्रात लोकसभेच्या उमेदवारीसंबंधी अधिकृत काहीही छापून येत नाही तोवर शिवसनिकांनी माध्यमातून चर्चा होणाऱ्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. खासदार गणेश दुधगावकर यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी असल्याचे वृत्त जिल्हाभर पसरल्याची पाश्र्वभूमी त्यांच्या या सल्ल्यामागे होती.
येथील गीता प्लाझामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी झाला. परभणी लोकसभा मतदारसंघाशी संबंधित हा मेळावा असल्याने याला जालना जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारीही हजर होते. मात्र खासदार गणेश दुधगावकर, आमदार संजय जाधव, मीरा रेंगे या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची बठकीला अनुपस्थिती होती.
बठकीच्या प्रारंभी शिवसेनेच्या काही तालुकाप्रमुखांनी खासदार दुधगावकर यांच्यावर टीका केली. खासदार हे आम्हाला भेटत नाहीत, आमच्या सुख-दु:खांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही. उलट त्यांचा फंडही ते काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतात, अशी टीका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात केली. रवींद्र धम्रे, सखुबाई लटपटे, छगन मोरे, मोहन अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात खासदारांवर टीका केली. जिल्हाप्रमुख खराटे यांनीही खासदार दुधगावकर यांच्याविरोधी सूर आळवला. तालुकाप्रमुखांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी आपण सहमत आहोत, असे खराटे म्हणाले.
यावेळी खोतकर यांनी जालना जिल्ह्याने परभणी लोकसभा मतदारसंघाच्या यशात नेहमीच मोलाचा वाटा उचलला आहे, असे सांगून भविष्यातही पक्षाच्या वतीने जो उमेदवार निश्चित होईल त्या उमेदवारासाठी आम्ही परिश्रम घेऊ, असे ते म्हणाले.
अग्रवाल यांचे मनोगत चालू असताना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न मिल्रेकर यांनी केला. वैयक्तिक टीकाटिप्पणी करूनका, असे ते म्हणाले. त्यानंतर सर्वच कार्यकत्रे उठले, अग्रवाल यांना बोलू द्या असा आग्रह बाकीच्या कार्यकर्त्यांनी धरला. यावर मिल्रेकर यांनी काही पक्षशिस्त आहे की नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांना खडसावले. त्यानंतरही शेवटी आपल्या भाषणात मिल्रेकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ ‘सामना’ वृत्तपत्रात येणारी माहितीच विश्वसनीय आहे. अन्य वृत्तपत्रातून जर लोकसभेच्या अनुषंगाने काही माहिती प्रसिद्ध होत असेल तर त्यावर शिवसनिकांनी विश्वास ठेवू नये, असे मिल्रेकर म्हणाले. एखाद्यावर टीका करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्याही जबाबदारीचा विसर पडू देता कामा नये. शिवसेनेने अनेकांना सत्तेची संधी दिली. अशांनी एकतर्फी राजकारण करूनये. सर्व शिवसनिकांना सोबत घ्यावे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला खासदारांच्या तक्रारीचा पाढा
खासदार आम्हाला भेटत नाहीत, गेल्या कित्येक दिवसांत त्यांचे आमचे दर्शनही नाही येथपासून ते खासदार आपला विकास निधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतात, अशा अनेक तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर यांच्यासमक्ष वाचला.
First published on: 29-06-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of mps by shiv sena office bearer