येथील सेंट झेवीयर्स या इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये बालवाडीच्या वर्गात प्रवेश देताना पालकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक केली जाते. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो. विद्यार्थी-पालक यांच्याशी प्राचार्य फादर बर्टी हे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सेंट झेवीयर्स स्कूल प्रवेश पालक संघाने पत्रकार परिषदेत बोलताना केली.     
संघाचे समन्वयक अमर पाटील यांनी सांगितले की, शहरातील नामांकित शाळा म्हणून सेंट झेवीयर्स ओळखली जाते. राजर्षी शाहूमहाराजांनी या शाळेला भूखंड मिळवून दिला. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ ला लागू केला असताना या कायद्याचे उल्लंघन या शाळेकडून केले जात आहे. शासनाचे अनुदान शाळेला मिळत असल्याने सर्व शासकीय नियम व निकष यांना लागू होतात. पण ते धाब्यावर बसवून शाळा चालविली जाते. विद्यार्थ्यांची जात, धर्म, वर्ण, भाषा या दर्जावर या शाळेत प्रवेश दिला जातो. मोफत
प्रवेश नाकारला जातो. १० ते ३० हजार रुपये डोनेशन देणाऱ्यांना नियमाचे उल्लंघन करून प्रवेश दिला जातो.     
सेंट झेवीयर्समधील प्रवेश प्रक्रिया नियमांना बगल देऊन कशी चालविली जात आहे, या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक व्ही.बी.पायमल यांना पालक संघाने दिले आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडे शाळेच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र शाळेतील पालक संघाच्या पालकांची ढाल पुढे करून सारवासारव केली जाते. शाळेच्या प्रवेशासाठी तसेच अन्य कामांसाठी प्राचार्य फादर बर्टी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून दुरूत्तरे केली जातात. पालकांना अवमानकारक वागणूक देणाऱ्या बर्टी यांच्यावर ३० जुलैपर्यंत कारवाई करून निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेस विजय करजगार, आनंदराव चव्हाण, पद्माकर कापसे, फिरोज सरगूर, शिवाजी ससे, महेश उरसाल, आकांक्षा आरडे, नंदकिशोर अहिर, मधुकर नाजरे आदी उपस्थित होते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा