शिवसेनेच्या पक्ष संघटनेची जिल्ह्य़ाची जबाबदारी असणाऱ्या एका नेत्याला शुक्रवारी बरीच धावपळ करावी लागली. कारण घरगुती होते. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली. ती ४९८ ची होती. पोलीस दलात ४९८ ची तक्रार म्हणजे ‘गिऱ्हाईक’च मानले जाते. नवरा, सासू-सासरा, दीर यांच्यापासून मानसिक छळ असे हे कलम आहे. ही तक्रार शिवसेनेच्या नेत्याची होती. त्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरली. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फोन खणखणले. गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगितले गेले. पण नक्की तक्रार काय आणि कारणे काय, याची माहिती पोलीस देत नव्हते!
शिवसेनेच्या या नेत्याला आमदार होण्याची इच्छा आहे. त्यांची बांधणीही तशी सुरू असल्याचे शहरात चर्चा असते. आज दुपारी आविष्कार कॉलनीतून ३१ वर्षांच्या महिलेने सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. त्याचे स्वरूप पोलिसांनी पद्धतशीरपणे लपवून ठेवले. ही माहिती बाहेर फुटू नये, असे प्रयत्न पोलीस निरीक्षक करत होते. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही जणांनी आवर्जून फोन केले. ते रजेवर होते. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देत नसेल तर कंट्रोल रूमकडून ती घेता येईल, असे उत्तर दिले. शेवटी सायंकाळी गैरसमजातून हा प्रकार झाला होता, असा खुलासा या नेत्याने केला.

Story img Loader