अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देऊन घाबरवायचे, त्यानंतर अवैध बांधकाम अधिकृत करून देण्याची हमी द्यायची. त्या मोबदल्यात बांधकाम व्यावसायिकाकडून लाखोची खंडणी उकळायची आणि पैसे दिले नाही तर बांधकाम पाडण्याची पुन्हा धमकी द्यायची, असा गोरखधंदा महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांनी आयुक्त, उपायुक्तांच्या मदतीने सुरू केलेला आहे. एका हॉस्पिटलच्या बांधकामासंदर्भात हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित डॉक्टराने या नगरसेवकाची तक्रार थेट ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याकडे केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 बिल्डर व डॉक्टर लॉबीकडून या शहरात सध्या अनधिकृत बांधकाम जोरात सुरू आहेत. एखादी फ्लॅट स्कीम बांधायची असेल किंवा डॉक्टरला हॉस्पिटलची इमारत उभी करायची असेल तर त्याचा मंजूर नकाशा एक असतो आणि प्रत्यक्षात बांधकाम दुसरेच असते. अवैध बांधकामाचा हा प्रकार आजच सुरू झाला अशातला भाग नाही. गेल्या कित्येक वर्षांंपासून हे सुरू असून कॉंग्रेसच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या काळात अधिक जोरात सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहे. पालिकेत सत्तेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आयुक्त व उपायुक्तांच्या मदतीने लाखो रुपयांच्या मोबदल्यात अनधिकृत बांधकाम अधिकृत करून देण्याची नवी स्कीमच सुरू केलेली आहे. जटपुरा गेट परिसरात डॉ. रवी अल्लूरवार यांच्या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. अतिशय लहान म्हणजे केवळ १८०० चौरस फुटाचा हा प्लॉट आहे. नियमानुसार हॉस्पिटलचे बांधकाम करतांना वाहनतळ आवश्यक आहे, मात्र ९०० फुटाच्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी वाहनतळाची आवश्यकता नाही, हा पालिकेचा नियम आहे. या नियमाचा आधार घेत वाहनतळात जागा वाया न घालवता ९०० फुटाचे दोन तुकडे करण्यात आले. त्यानंतर पालिकेकडून बांधकामाचा नकाशा मंजूर करण्यात आला. पालिकेच्या नगर अभियंत्यांनी नकाशाला तात्काळ मंजुरी प्रदान केली.
अतिशय गुपचूपरित्या हे काम सुरू असतांना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची या बांधकामावर वक्रदृष्टी पडली आणि सर्व जण सक्रीय झाले. दिवाळीच्या सुटय़ा संपताच संबंधित डॉक्टरला पालिकेने अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची नोटीस बजावली. नोटीस मिळताच डॉक्टर घाबरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये तोडी करण्यात सक्रीय असलेले नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी डॉक्टरच्या भ्रमणध्वनीवर फोन करण्यास सुरुवात केली. पाच लाख रुपये देत असाल तर अनाधिकृत बांधकाम अधिकृत करून देण्याचा प्रस्तावच या नगरसेवकाने डॉक्टरसमोर ठेवला. पैसे देत नसाल तर बांधकाम पाडण्याची धमकी या नगरसेवकाने देऊन टाकली. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टराने नातेवाईकांच्या माध्यमातून ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याचे घर गाठले आणि सत्ताधारी कॉंग्रेस नगरसेवकांकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने संबंधित नगरसेवकाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बोलावले, मात्र या नगरसेवकाने बाहेर असल्याचे कारण सांगत जाणे टाळले. बांधकाम व्यावसायिक व डॉक्टरांना धमकी देऊन पैसे उकळण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे, मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांनी अशा अवैध बांधकामांचा शोध घेऊन बिल्डर व डॉक्टरला अशा पध्दतीने धमकावून पैशाच्या मोबदल्यात बांधकाम अधिकृत करून देण्याची योजनाच सुरू केली आहे. शहरातील बहुतांश अवैध फ्लॅट स्कीम तर जैसे थे उभ्या आहेत. अशा स्कीमवर किंवा बिल्डरवर पालिकेने अजून कुठलीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. केवळ अवैध बांधकामाची नोटीस द्यायची आणि पैसे मिळाले की, गुपचूप बसून बांधकाम नियमित करून द्यायचे, असा हा गोरखधंदा अविरत सुरू आहे, मात्र डॉक्टरचे हे प्रकरण उघडकीस येताच आता पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड यांना विचारणा केली असता संबंधित डॉक्टरला अवैध बांधकामाची नोटीस बजावली असल्याचे लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा