खोटय़ा नावाने केलेल्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखविण्याऐवजी त्या अर्जातील तक्रारीची शहानिशा केल्यामुळे भूगर्भात रसायने पेरून त्यापासून वीटभट्टीसाठी लागणाऱ्या ज्वलनशील पदार्थाची निर्मिती करणाऱ्या दोन जणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. ही घटना पनवेल तालुक्यातील नावडे गावाजवळ घडली. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी मुंबई कुर्ला येथे राहणाऱ्या जितलाल बुद्धिराम बिंद (३४) आणि मुंब्रा-कौसा येथे राहणाऱ्या अख्तरखान रहिसखान (२८) या तरुणांना अटक केली. एप्रिल महिन्यात अरुण पवार (बदललेले नाव) या सतर्क नागरिकाने राज्याचे गृहमंत्री ते पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त यांना नावडे गावाजवळ जमिनीत रसायने पेरून ज्वलनशील द्रव्यपदार्थाची निर्मिती करण्याचा प्रकार होत असल्याची लेखी तक्रार केली होती. राज्याच्या गृहमंत्रालयाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही, परंतु नवी मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तांनी हा अर्ज तळोजा पोलिसांकडे चौकशीसाठी पाठविला असता तक्रारीत केलेली सत्य परिस्थिती उजेडात आली. या तक्रार अर्जासोबत संबंधित ठिकाणी पोलिसांनी कसे पोहोचावे यासाठी अर्जदाराने एक नकाशा लावला होता. या नकाशात संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा दर्शविणाऱ्या खुणा होत्या. सहायक पोलीस आयुक्त सूर्यवंशी यांनी या अर्जाची चौकशी करण्यासाठी तळोजा पोलिसांकडे हा अर्ज सोपविला. त्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांनी या अर्जाची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक अजित सुळे यांच्याकडे सोपविली. पोलिसांनी प्रथम तक्रार कोणी केली याबाबत चौकशी सुरू केली. शोध मोहिमेत संपूर्ण नावडे गाव पालथा घातला परंतु पोलिसांना अरुण पवार नावाची व्यक्ती काही सापडली नाही. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीवरून मुंबईत कुर्ला येथे राहणाऱ्या जितलाल बुद्धिराम बिंद (३४) आणि मुंब्रा कंसा येथे राहणाऱ्या अख्तरखान रहिसखान (२८) या तरुणांना घटनास्थळावरून अटक केली. ही रसायने दलालांमार्फत त्यांना देण्यात येतात. त्यानंतर जमिनीत खोलवर खड्डे मारले जातात आणि या खड्डय़ांमध्ये रसायन, प्लॅस्टिक, माती, लाकडाचा भुसा असे मिश्रण करून ही रसायने सुकवून तयार झालेल्या रासायनिक पदार्थाचे उत्पादन केले जाते. हा पदार्थ भट्टी जास्त वेळ जळत राहण्यासाठी उपयोगी पडत असल्याने वीटभट्टीमालकांना तो विकला जातो. तीनशे रुपये दराने एक ड्रम रसायन विकत घेतले जाते आणि साडेतीनशे रुपये दराने हा तयार केलेला रासायनिक पदार्थ विकला जातो, अटकेत असलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले.  या प्रकरणात जप्त केलेला घातक रसायनांनी भरलेले १२ ड्रम न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये विघटनासाठी पाठविणार असल्याची माहिती दिली आहे; परंतु जी रसायने भूगर्भात पुरली गेलीत त्या जमिनीचे शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण कसे करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Story img Loader