पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच रस्त्यावरील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सेवा उपयोगिता वाहिन्या स्थलांतर करण्याची कामे तातडीने पूर्ण करून रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याचे अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे, असे स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
पावसाळा सुरू झाल्यानंतर अधिकारी वर्ग रस्त्यावरील खड्डे, चऱ्या बुजवण्याची कामे ठेकेदारांमार्फत सुरू करतात. पावसाचा जोर अधिक असला की कामे पडून राहातात. यावेळी पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नालेसफाईची कामे चौदा संस्थांकडून सुरू आहेत. नाल्याकाठी काढलेला गाळ तात्काळ उचलून तो कचराक्षेपण भूमीवर टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
१५ मेपासून पालिकेचा आपत्कालीन कक्ष सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांना खड्डे, रस्ते, पाणी तुंबणे याविषयी कोणताही त्रास होणार नाही याविषयीची काळजी घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच राहील. पालिकेच्या ज्या मोकळ्या जागा, मुख्य ठिकाणी मोठे नाले आहेत, त्यांच्यावर शेड टाकून त्या जागा फेरीवाल्यांना उपलब्ध करून देऊन त्यांना पालिकेकडून भाडे आकारले जाईल असा विचार आहे.