गेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या कृष्णभुवन या निवसास्थानासमोर मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. मंगेश सांगळे विक्रोळीतून विजयी म्हणून सर्वप्रथम घोषित झाले होते. ढोल-ताशे आणि गुलालाची उधळण होत होती. राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला जातीने उमेदवारांचे स्वागत करत होते. नितीन सरदेसाई दादर-माहिममधून विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते..आज पाच वर्षांनी चित्र पूर्णपणे पालटले होते दादरचा मनसेचा गड पडला, मुंबईतील मनसेचे सर्व उमेदवार पराभूत झाले. ज्या राम कदम यांना ‘हे राम’ म्हणावे लागेल असे प्रचारात राज म्हणाले होते ते राम कदम भाजपच्या तिकिटावर दणक्यात जिंकून आले..कृष्णभुवनवर यावेळी होता तो एक सन्नाटा.. ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई..!’ या शोलेमधल्या सन्नाटय़ासारखा!
लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभावानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘या, मला काही बोलायचे आहे’ अशी साद घालत सोमय्या मैदानावर सभा घेतली. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत आपण स्वत: निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मनसेमध्ये एक जोश निर्माण झाला होता. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत अवघा महाराष्ट्रा हा माझा मतदासंघ असल्याने आपण कोणत्या एका मतदार संघातून लढणार नाही, असे सांगत राज यांनी पलटी खाल्ली तेव्हाच मनसेचे काय होणार हे स्पष्ट झाले होते.
विधानसभा निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रात पानिपत झाल्यानंतर ‘मला आता काहीच बोलायचे नाही’ असा सूर सर्व पदाधिकारी व नेत्यांचा दिसत आहे. ‘राजगड’वर एरवीही फारसे पदाधिकारी फिरकत नाहीत. निकालानंतर तर सारेच शांत होते. काय बोलायचे हे तेथील कोणत्याच कर्मचाऱ्याला कळत नव्हते. सेना-भाजप युती तुटल्यामुळे एक आशा निर्माण झाली होती. किमान सात-आठ जागा मिळतील, अशी आशा मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करत होते. मागठाण्यात प्रवीण दरेकर, दादरमध्ये नितीन सरदेसाई, भांडुपमध्ये शिशीर शिंदे निश्चित विजयी होतील, अशी खात्री व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मुंबईतील मनसेचे सारेच गड भुईसपाट झाले. बाळा नांदगावर, दरेकर, नितीन सरदेसाई यांच्या पराभवानंतर मनसेत सारेच ठप्प झाले. मनसेच्या मुंबईतील जवळपास सर्वच कार्यालयात सारे काही थंड होते. असे कसे झाले, याच विचारात मनसेचे कार्यकर्ते दिसत होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ होते!

Story img Loader