असमतोल ही एक प्रवृत्ती आहे, तिचा उगम घरीच होतो. ही प्रवृत्ती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत असमतोल दूर होणार नाही. आजचे परिवर्तन सरळ रेषेत नाही. बदलत्या वातावरणाप्रमाणे संशोधन करावे लागेल, त्यानंतरच असमतोल दूर करता येईल. या विषयापलीकडे जाऊन वेगळा विचार केला तरच काही चांगले निर्माण होईल. विकासासाठी ऊर्जा आवश्यक असून नव्या संकल्पनातूनच सर्वसमावेशक विकास साधता येईल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी केले.
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या २४व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त अनंतराव घारड यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. वेळुकर बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक नेते, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. व्यासपीठावर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री अॅड. मधुकर किंमतकर, इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सचिव डॉ. बलविंदर सिंग, प्राचार्य टी.ए. शिवारे, डॉ. कुरुंदकर, डॉ. बबन तायवाडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे एक युनिट समजले तर विदर्भ राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत विकासात माघारलेला आहे. ‘मिहान’चे रडत घोंगडे सुरू आहे. बुटीबोरी औद्योगित वसाहतीत केवळ २० टक्के उद्योग सुरू आहेत. भूखंड मात्र एकही शिल्लक नाही. विदर्भातील साधन संपत्तीचा उपयोग केला तर विकास होईल. विकासाबाबत अजूनही आशावादी असल्याचे घारड यावेळी म्हणाले. इंडियन कॉमर्स असोसिएशनला बऱ्याच गोष्टी दिलेल्या असल्याने महाराष्ट्राला प्रणाम करतो, असे महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेला इंडियन कॉमर्स असोसिएशनने मान्यता दिल्याचे सचिव डॉ. बलविंदर सिंग यांनी जाहीर केले.
‘राज्यातील प्रादेशिक असमतोल’ या विषयावर अॅड. किंमतकर यांचे बीजभाषण झाले. विदर्भाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळविला जातो. तीन वर्षांत विदर्भाच्या वाटय़ाचे २० हजार कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आले. राज्याचा समतोल विकास व्हावा, विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे सरकारकडून पालन होत नाही, असे अॅड. किंमतकर म्हणाले.
अधिवेशनात प्राचार्य टी.ए. शिवारे, डॉ. राम सावळे, डॉ. जयंत जोशी, डॉ. मधु नायक, डॉ. भरत मेघे, डॉ. आर.जी. इंगोले, डॉ. वर्षां सुखदेवे यांचा सत्कार करण्यात आला. राज्य वाणिज्य परिषदेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. अधिवेशनाला डॉ. अनिल भावसार, डॉ. एस.जी. चापके, डॉ. एस.आर. माळी, डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. बाबा सांगळे, प्राचार्य गोडघाटे, डॉ. एम.जी. करांगळे यांच्यासह राज्यातून आलेले वाणिज्य विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. भरत यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संगीता जीवनकर व डॉ. वर्षां ठाकरे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा