पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत व प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सुमारे ३४ हजार ८८८ कोटी निश्चित करण्यात आले आहे. या कर्जाचे जिल्हानिहाय वाटप राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत करण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्तता प्रत्येक बँकेने शंभर टक्के करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी दिले आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात २०१३-१४ या वर्षांच्या पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्रकुमार जोशी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सुभाषचंद्र विवरेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक बँकांच्या शाखांनाही जिल्हास्तरीय समन्वय समितीने पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले असून शेतकऱ्यांनी या पीक कर्ज योजनेचा फायदा घेण्याचे आवाहनही अ‍ॅड.वळवी यांनी केले आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत अशा बँकांसंदर्भात आपले गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी तालुक्याच्या साहाय्यक निबंधकांकडे करण्याची सूचनाही त्यांनी केली.
नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बँक नाही. धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी एकच मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्या बँकेमार्फत नंदुरबार जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप करण्यात येते. तसेच नंदुरबार जिल्ह्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही अग्रणी बँक म्हणून कार्यरत आहे. जिल्ह्यासाठी २०१३-१४ करिता वार्षिक पत आराखडय़ात कृषी कर्ज वाटपाच्या लक्षांकानुसार जिल्हा बँकेस एकूण १३० कोटी, राष्ट्रीयकृत बँकासाठी ३४८ कोटी ५१ लाख, ग्रामीण बँकांसाठी तीन कोटी चार लाख रुपये याप्रमाणे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.