दहशतवाद विविध रूपांत समोर येत आहे. दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य हे सायबर हल्ला करण्याचे आहे. त्यामुळे या संभाव्य हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस पुढे सरसावले आहेत. सायबर हल्ल्यापासून देशाला वाचविण्यासाठी कार्यरत असलेल्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात ‘सर्ट’चे प्रादेशिक उपकेंद्र लवकरच मुंबईत उभारण्यात येणार आहे.
सर्ट सायबर हल्ले रोखण्याचे काम करते. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली ही सायबर सुरक्षा एजन्सी आहे. २००५ साली तिची स्थापना झाली. त्या वेळी भारतीय आयपी अ‍ॅड्रेस वापरून विविध सरकारी एजन्सींना धमक्यांचे ई-मेल येत होते. चीनमधूनही विविध प्रकारचे व्हायरस सोडण्यात येत होते.
राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेताना जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्टचे केंद्र मुंबईत आणण्याची सूचना केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर हे केंद्र मुंबईला आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. प्रमुख बँकांची मुख्यालये, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज शहरात आहे.
त्यांची सायबर सुरक्षा हे मोठे आव्हान आहे. सर्टची टीम अतिशय वेगाने काम करून सायबर हल्ले परतवून लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामासाठी एक हजार पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना विद्युत नोटबुकही देण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या गुन्हे शाखेचा सायबर कक्ष आणि स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे शहरात कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा