केंद्र सरकारच्या ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन स्कूल’ (आयसीटी) योजनेंतर्गत, तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून संगणक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. त्यात नगर जिल्हय़ातील २०७ शाळांची निवड झाली आहे. नगर शहरातील १३ शाळांचा समावेश आहे. जिल्हय़ातील या शाळांना तब्बल २ हजारांहून अधिक संगणक व इतर साहित्य तर मिळणार आहेच, शिवाय संगणक अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ स्वतंत्र शिक्षकही (निदेशक) उपलब्ध होणार आहे.
जिल्हय़ातून ५५२ शाळांची शिफारस करण्यात आली होती. त्यातील २०७ शाळा निकषानुसार निवडण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून मिळाली. केंद्र सरकारसाठी आय.एल. अँड एफ. एस. एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेस लि. (नोएडा) ही कंपनी संगणक, इतर साहित्य व निदेशक येत्या मार्चपर्यंत मोफत उपलब्ध करणार आहे. जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात २१ तर दुसऱ्या टप्प्यात १४८ शाळांची निवड झाली होती.
‘बुट मॉडेल’ (बिल्ट, ओन, ऑपरेट अँड ट्रान्सफर) पद्धतीने ही योजना केंद्र सरकार ५ वर्षांसाठी राबवते. तिन्ही टप्प्यांसाठी स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती झाली आहे. पूर्णवेळ निदेशकाचे वेतन, इंटरनेट व वीजबिल व स्टेशनरीचा खर्च सरकारने कंपनीस पूर्वीच अदा केला आहे. निदेशक मुख्याध्यापकाच्या नियंत्रणाखाली काम करेल. शाळेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी १० संगणक, प्रिंटर, वेब कॅमेरा, स्कॅनर, इंटिग्रेटेड कॉम्प्युटर प्रोजेक्टर आदी साहित्य दिले जाणार आहे. मात्र ही मालमत्ता सरकारची असेल. तिचा पुरवठा झाल्यानंतर शंका असल्यास स्थानिक पातळीवर आयटीआय, तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी कॉलेजमधील संगणकतज्ज्ञांकडून पडताळणी करून घ्यायची आहे. संगणक प्रयोगशाळा उभारताना शाळा किंवा व्यवस्थापनाकडून कंपनीला योग्य सहकार्य न मिळाल्यास, शाळेची निवड रद्द करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.
जिल्हय़ातील तालुकानिहाय शाळांची संख्या अशी : नगर शहर १३, नगर तालुका १४, अकोले १६, जामखेड १०, कोपरगाव १३, कर्जत २०, नेवासे १४, पारनेर १४, पाथर्डी ७, राहुरी १३, राहाता १४, शेवगाव १५, संगमनेर १३, श्रीगोंदे १४ व श्रीरामपूर १७. नगर शहरातील शाळा पुढीलप्रमाणे : प्रगत विद्यालय, मौलाना आझाद मुलींची शाळा, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, जे. एम. स्कूल, श्रीकांत गुगळे, भाग्योदय, रेणावीकर, रेसिडेन्सिअल, सीताराम सारडा, ल. भा. पाटील कन्या शाळा, पाडकवी, भाई सथ्था, काकासाहेब म्हस्के शाळा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer lab in 207 schools from ict scheme