सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मिरविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभागृह बाबा आदमच्या जमान्यातले आहे. अपुरी जागा, दाटीवाटीने बसलेले सदस्य, सदस्यांच्या खुच्र्याना खेटूनच मांडण्यात आलेल्या अधिकारी-पत्रकारांच्या खुच्र्या, त्या पटकविण्यासाठी पत्रकार-अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच..सभा सुरू असताना मधूनच चहा-बिस्किटांच्या किटल्या घेऊन फिरणारा शिपाई वर्ग, बिस्किटे पदरात पाडून घेताना सभागृहातच एकमेकांना खेटून सुरू असणारा धसमुसळेपणा..एखादा बाजार भरला असल्यासारखे हे चित्र हजारो कोटी रुपयांच्या कंत्राटांच्या आर्थिक नाडय़ा स्वतकडे ठेवणाऱ्या स्थायी समिती सभागृहाचे असल्याने महापालिकेच्या एकंदर कारभार कसा असेल, याची कल्पना कुणालाही येईल. नेमके हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न तब्बल दोन दशकांनंतर सुरू झाले असून पुढील काही महिन्यात हे संपूर्ण सभागृह ‘पेपरलेस’ करण्याचा आराखडा अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे. या नव्या आराखडय़ानुसार स्थायी समितीचे कामकाज कसे चालते, कोणती कंत्राटे या ठिकाणी मंजूर होतात, कोणत्या कामांचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत, याची सविस्तर माहिती सर्वसामान्य ठाणेकरांनाही मिळू शकणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णय अवघ्या काही सेकंदात महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतील अशी व्यवस्था यानिमित्ताने करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे नगर अभियंता के. डी. लाला यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. ठाणे महापालिकेच्या कोटय़वधी रुपयांच्या अर्थसंकल्पाचे नियोजन करणाऱ्या स्थायी समितीची बैठक मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृहात होते. स्थायी समितीचे सदस्य, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख, पत्रकार, असे ७० ते ८० जण या बैठकीच्यानिमित्ताने उपस्थित असतात. मात्र, या सभागृहाची आसन क्षमता ३० ते ३५ इतकीच असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेरच थांबावे लागते. तसेच काही वेळेस जागेअभावी पत्रकारांना बैठकीचे वृत्तांकन करता येत नाही. त्यामुळे स्थायी समितीचे नवे सभागृह उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे.
नवा आराखडा..नवे सभागृह
हा दबाव सातत्याने वाढू लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीचे नवे अद्ययावत सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे. महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या दुसऱ्या मजल्यावरील नव्या कार्यालयाच्या नेमक्या वरच्या मजल्यावर हे सभागृह उभारण्यात येणार आहे. या सभागृहाची आसनक्षमता ८० ते ९० इतकी असणार आहे. भविष्यात सदस्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. या विचारातून सदस्य आसनक्षमता तयार करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख तसेच पत्रकार आदींसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापतींचे कार्यालय या सभागृहाजवळ उभारण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्य, अधिकारी आणि पत्रकारांच्या टेबलवर संगणक बसविण्यात येणार असून त्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने बैठक चालविण्याचा महापालिकेचा विचार आहे. ‘पेपरलेस’ पद्धतीचा वापर करण्यासाठी महापालिकेने ही योजना हाती घेतली आहे. येत्या वर्षभरात हे अद्ययावत सभागृह उभारण्याचा महापालिकेचा विचार असून त्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ऑनलाइनचा सर्वसामान्यांना फायदा
स्थायी समितीची विषय पत्रिका आणि गोषवारा सदस्य, अधिकारी तसेच पत्रकारांच्या टेबलावरील संगणकावर उपलब्ध असणार आहेत. सभांमधील विषयावर मत नोंदविण्यासाठी ऑनलाइनची सुविधा सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे स्थायी समितीमधील निर्णय काही सेकंदातच महापालिकेच्या संकेतस्थळावर दिसू शकतील. जेणेकरून ते सर्वसामान्य ठाणेकरांना पाहाता येऊ शकतील, असा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा